मुंबईतील वरळीच्या परिसरात रविवारी पहाटे भरधाव वेगात कार चालवत मिहीर शाह या तरुणाने दोघांना धडक दिली होती. या भीषण अपघातात कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते होते. मात्र, या प्रकरणानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती. यानंतर राजेश शाह यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरळी येथे बीएमडब्ल्यू या अलिशान कारने ४५ वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहीर शाह याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आज मिहीर शाह याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शाह याने पलायन केलं होतं. रविवारपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. अखेर मंगळवारी मिहीर शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. याबरोबरच आरोपी मिहीर शाह याची आई आणि दोन बहिणांनीही मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे.

हेही वाचा : अपघातानंतर मिहीर शाहकडून ओळख लपवण्याचा प्रयत्न? पोलिसांना चकवा देण्याकरता शक्कल!

दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईमधील वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला आता अटक करण्यात आली. याशिवाय त्याची आई आणि बहिणीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीर शाह हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा होता. दरम्यान, हा अपघात घडला त्यावेळी मिहीर शाह याने जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केलं होतं, अशी माहिती समोर आली होती. यानंतर मिहीर शाह स्वतः कार चालवत होता, असा आरोप आहे.

मिहीर शाहला पोलिसांनी कसं पकडलं?

मिहिरने त्याचा आणि त्याच्या मित्रांचा मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे पोलिसांना त्यांचं लोकेशन ट्रॅक करणं अवघड गेलं. मिहिर शाह त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत शहापूरमधील एका रिसॉर्टमध्ये थांबला होता. परंतु, थोड्या वेळाने मिहीर त्याच्या मित्रांबरोबर घरच्यांना न सांगताच विरारला पळाला. दरम्यान, मिहीरच्या मित्राने त्याचा मोबाईल मंगळवारी सकाळी १५ मिनिटांसाठी सुरू केला अन् पोलिसांनी तत्काळ त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं. यामुळे पोलिसांनी तत्काळ वेगाने त्यांची सूत्र फिरवली आणि मिहीरला विरार येथून अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worli hit and run case rajesh shah expelled from shiv sena shinde group gkt
Show comments