राज्यात ज्याप्रमाणे अनाधिकृतपणे पब संस्कृती वाढते आहे, त्याला राज्य सरकारचा आणि गृहखात्याचा गलथानपणा जबाबदार आहे. पब संस्कृतीमुळे आज राज्यातील तरुणाई बरबाद होते आहे, अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. तसेच हे सगळं जर थांबणार नसेल, तर जनतेला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. रवींद्र धंगेकर यांनी आज वरळी अपघातातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाचे सात्वन केलं. तसेच या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
“महाराष्ट्रात आज पब संस्कृती फोफावते आहे. यात श्रीमंत बापाची माजोरडी मुलं अडकत चालली आहे. या पबमध्ये बसून ज्या प्रकारे मुलं मस्ती करतात, त्यामुळे दर आठवड्यात महाराष्ट्रातील एखाद्या कुटुंबाला भोगावं लागतं. नाखवा कुटुंबाच्याबाबतीतही तेच झालं. तीन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात नाखवा कुटुंबातील महिलेला फरफटत नेल्या गेले. इतकंच नाही तर त्यांच्या अंगावरून गाडीही चालवण्यात आली. त्यामुळे हा अपघात नसून एक प्रकारे क्रूर हत्या आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली.
“डोळ्यासमोर पत्नीचा मृत्यू होतो, ही वेदनादायी बाब”
“ज्याप्रकारे हा अपघात झाला, ते अतिशय दुर्दैवी आहे. आज आम्ही नाखवा कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या घरची परिस्थिती बघितली. आपल्या पत्नीचा आपल्या डोळ्यासमोर मृत्यू होतो, हीच मुळात अतिशय वेदनादायी बाब आहे. राज्यात ज्याप्रमाणे अनाधिकृतपणे पब संस्कृती वाढते आहे, त्याला राज्य सरकारचा आणि गृहखात्याचा गलथानपणा जबाबदार आहे. पब संस्कृतीमुळे आज राज्यातील तरुणाई बरबाद होते आहे”, असेही ते म्हणाले.
“…मग उत्पादन शुल्क विभाग फक्त पैसे खातो का?”
“माझी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, त्यांनी सर्वात आधी राज्यातील पब बंद करावे. कालही एका पबवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. याचा अर्थ तो पब अनाधिकृत होता. मग अशावेळी उत्पादन शुल्क विभाग फक्त पैसे खातो का? असा प्रश्न पडतो. हे सगळं जर थांबणार नसेल, तर जनतेला कायदा हातात घ्यावा लागेल”, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला.
हेही वाचा – Hit and Run Case : आरोपी मिहीर शाह पोलिसांना म्हणाला, “माझं करीअर आणि…”…
“या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करा”
“या अपघातातील आरोपी हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्याचा मुलगा आहे. अपघात झाला त्यावेळी तो मद्य प्राशन करून होता. तरीही तो पोलिसांना का सापडला नाही? त्याची नशा उतरल्यानंतरच तो पोलिसांना कसा सापडतो? याचा अर्थ पोलिासांनी ठरवून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही रवींद्र धंगेकर यांना केला. तसेच याप्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.