Worli Murder Case Update : वरळी नाका येथील स्पामध्ये गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या पायावर मराठीत त्याच्या शत्रूंची नावे आणि फोन नंबर असलेले २२ पेक्षा जास्त टॅटू होते. त्यामुळे हा प्रकार गजनी (चित्रपट) स्टाईल असल्याचं म्हटलं जातंय. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शत्रूंची नावे आणि नंबर अंगावर गोंदवून घेत असे

चुलबुल पांडेचं जेव्हा कोणाशी भांडण व्हायचं तेव्हा तो त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर त्याच्या अंगावर गोंदवून घेत असत. तसंच, त्याला काही झालं तर त्याच्या मृत्यूला हे लोक जबाबदार असतील अशी चिठ्ठीही लिहून ठेवत असतं. एवढंच नव्हे तर वाघमारे रोजनिशी लिहित असत. रोज घडणाऱ्या घटनांविषयी त्याने या डायरीत नमूद करून ठेवलेलं आहे. तो कोणाशी बोलला, कोणाला भेटला, किती मद्यप्राशन केलं, कोणाशी व्यवहार केला यासंदर्भातील सर्व माहिती या डायरीमध्ये आहे. ही डायरी आणि कागदपत्रे त्याने विलेपार्ले येथील आंबेडकर नगर येथील त्याच्या घरी एका कपाटात ठेवली होती. या डायरीत अशा लोकांची नावे होती, ज्यांनी त्याला संपवण्याचा कट रचला होता.

हेही वाचा >> Worli Murder Case : आधी मद्यपान केले, मग स्पामध्ये जाऊन…, प्रेयसीसमोरच चुलबुल पांडेची निर्घृण हत्या, वरळीत हत्येचा थरार!

मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी केलेल्या संयुक्त कारवाईत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये वरळी येथील सॉफ्ट टच स्पा मालक संतोष शेरेगर (५०), नालासोपारा येथील मोहम्मद फिरोज अन्सारी (२६), राजस्थानमधील कोटा येथील साकिब अन्सारी (२८) आणि अन्य दोघांचा समावेश आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

चुलबुल पांडे स्पा मालकांना देत असे त्रास

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे स्पा मालकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध माहितीचा अधिकार (आरटीआय) अर्ज दाखल करत असे आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळत असे. यापूर्वी त्याने विरारमध्ये स्पा असलेले शेरेगर आणि अन्सारी यांना लक्ष्य केले होते. त्याच्या कृतीमुळे, त्यांचा स्पा व्यवसाय बंद झाला, ज्यामुळे त्यांनी त्याच्या हत्येचा कट रचला. शेरगर आणि अन्सारी यांनी बदला घेण्याचा निर्णय घेण्याच्या तीन महिन्यांपूर्वी, त्यांनी साकिबशी संपर्क साधला आणि वाघमारेला मारण्यासाठी सहा लाख रुपये दिले. गेल्या तीन महिन्यांत अन्सारी आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनी हेरगिरी केली आणि वाघमारेच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले.

हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?

घटनेच्या आदल्या रात्री वाघमारे वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन मित्र आणि एका २१ वर्षीय मैत्रिणीबरोबर सायन रेल्वे स्थानकाजवळील अपर्णा बार अँड रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्यानंतर वाघमारे आणि मेरी वरळी नाका येथील सॉफ्ट टच स्पामध्ये गेले. पहाटे अडीचच्या सुमारास मोहम्मद अन्सारी आणि साकिब अन्सारी यांनी स्पामध्ये प्रवेश करून त्याची मान व बोटे कापून संपूर्ण शरीरावर चाकूने वार करून पळ काढला. शिवडी न्यायालयाने संतोष शेरेगरला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित आरोपींना शुक्रवारी हजर करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worli murder case chulbul pandey had more than 22 tattoos with names and phone numbers of his enemies in marathi sgk