मुंबई : वरळी सी फेस परिसरात कावेरी नाखवा यांच्या अपघात प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला असून वरळी पोलीस या प्रकरणी एक – दोन दिवसांत ७०० हून अधिक पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या अपघाताचा एका प्रत्यक्षदर्शी टॅक्सीचालकाचा पोलिसांनी शोध घेतला असून महानगर न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर त्याची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत ३८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार अपघाताच्या वेळी मिहीर शहाने मद्यपान केल्याची बाब स्पष्ट झाल्यामुळे या प्रकरणी मोटर वाहन कायदा कलम १८५ ची वाढ करण्यात आली असून अपघातग्रस्त मोटरगाडीच्या नोंदणीसह आरोपी मिहीर शहा, राजऋषी बिडावत या दोघांचेही चालक परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे ही वाचा…महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल

मुख्य आरोपी मिहीर शहा, राजऋषी बिडावत व मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांच्याविरोधात एक-दोन दिवसांत शिवडी न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे. सुमारे ७१६ पानांच्या या आरोपपत्रात ३८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. वरळी पोलिसांनी नुकताच एका टॅक्सीचालकाचा शोध घेतला असून अपघाताच्या वेळी तो वरळी येथील सी. जे. हाऊससमोर उभा होता. आरोपी चालकाने कशा प्रकारने महिलेला फरपटत नेले याची माहिती त्याने पोलिसांना दिली असून त्याची साक्ष न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात येणार आहे. एवढा गंभीर अपघात माझ्या जीवनात मी पाहिला नसल्याची भावना व्यक्त करत या साक्षीदाराने घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती पोलिसांना दिली. या अपघातप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

हे ही वाचा…मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा

मिहीर शहाने मद्यापान केल्याचे पुरावे

या प्रकरणी राजऋषी बिडावत व मिहीर शहा या दोघांच्याही वैद्याकीय तपासणीत दारूचा अंश सापडला नाही. त्याबाबतचा अहवालही नकारात्मक (निगेटिव्ह) आला आहे. पण जुहू येथे मद्यपान केल्यानंतर मिहीर शहाने मालाड येथील साईनाथ बारमधून बिअरचे चार कॅन खरेदी केले. या प्रकरणी बिअर बारमधील एका वेटरच्या जबाबतून त्याला पुष्टी मिळाली आहे. मिहीरला ५०० मिलीचे चार टिन दिल्याचे या वेटरने सांगितले. तसेच जुहूमध्येही त्याने मद्यपान केल्याचे साक्षीदारांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी मोटर वाहन कायदा कलम १८५ (मद्याधुंद अवस्थेत गाडी चालवणे) वाढवण्यात आले आहे.