मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाद्वारे अर्थात शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवर शिवडीवरुन नवी मुंबईला केवळ २० ते २२ मिनिटांत पोहचण्याचे मुंबईकरांचे स्वप्न डिसेंबरअखेरीस वा नव्या वर्षांच्या सुरुवातीला पुर्ण होणार आहे. मात्र दक्षिण मुंबईत या सागरी सेतूच्या प्रवेशद्वारावर अर्थात शिवडीला सुकर, अतिवेगवान पोहचण्यासाठी मात्र वाहनचालक, प्रवाशांना आता डिसेंबर २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कारण या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) डिसेंबर २०२५ अशी तारीख देण्यात आली आहे. तर सागरी सेतूला जोडणार्या शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पात १९ इमारतींच्या पुनर्वसनाचा अडसर निर्माण झाला आहे. या अडसर दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान या रस्त्याचे आतापर्यंत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.
हेही वाचा >>> शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी – मुख्यमंत्री
एमएमआरडीएकडून २१.८० किमी लांबीच्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे ९६ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प डिसेंबरअखेरीस वा नव्या वर्षांच्या सुरुवातीला वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा सागरी सेतूवरून वाहतूक सुरू झाल्यास शिवडीवरुन नवी मुंबईत २० ते २२ मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. दक्षिण मुंबईवरून या सागरी सेतूच्या प्रवेशद्वारावर अर्थात शिवडीला पोहोचणे वाहनचालक, प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने ४.५ किमीचा वरळी ते शिवडी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला. १७ मीटर रुंद असा हा उन्नत रस्ता जमिनीपासून १५ ते २७ मीटर उंच असून या प्रकल्पासाठी अंदाजे १०५१.८६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या कामाला मे. जे. कुमार या कंत्राटदाराच्या माध्यमातून २०२१ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे. तर हा प्रकल्प २०२४ मध्ये पूर्ण होईल, असे एमएमआरडीएने सांगितले होते. मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
भूसंपादनाचा अडसर
सागरी सेतूबरोबरच हा रस्ता सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएने नियोजन होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पास विलंब होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता प्रकल्प दोन वर्षे पुढे ढकलला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूसंपादन हा मोठा अडसर ठरत आहे. या रस्त्यासाठी ८५० झोपडय़ांसह १९ इमारती बाधित होत आहेत. ८५० झोपडय़ा हटवल्या असल्या तरी प्रभादेवी येथील १९ इमारतींचे पुनर्वसन व्हायचे आहे.