मुंबई : वरळी नाका येथील स्पामध्ये गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याच्या हत्येप्रकरणी वरळी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यात स्पाचा मालक व मोहम्मद फिरोज अन्सारी यांचा समावेश आहे. याप्रकरणी आणखी तीन संशयीतांना गुन्हे शाखेच्या पथकाने कोटा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. वाघमारे याची सुपारी घेऊन हत्या केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. वरळीतील एका स्पामध्ये बुधवारी दुपारी २ च्या सुमारस दोघांनी वाघमारे याची भोसकून हत्या केली होती. एकेकाळी गुरू पोलिसांचा खबरी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विलेपार्ले येथे राहणारा गुरू वाघमारे याचा १७ जुलै रोजी वाढदिवस होता. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचा वाढदिवस १७ जुलै रोजी साजरा केला. गुरूचे वरळी नाका येथील ‘स्वॉफ्ट टच स्पा’मध्ये येणे – जाणे असल्यामुळे तेथील कर्मचारी त्याला ओळखत होते. स्पा कर्मचाऱ्यांनी गुरुकडे पार्टीची मागणी केली होती, गुरूने मंगळवारी पार्टी देण्याचे कबूलही केले होते. त्यानुसार स्पामधील तीन कर्मचारी, २१ वर्षांची तरुणी आणि गुरू अशा पाच जणांनी शीव येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री ८ वाजता पार्टी केली. त्यानंतर रात्री १२:३० वाजता पाचही जण पुन्हा वरळी येथील स्पामध्ये आले व तेथेच थांबण्याचा निर्णय सर्वांनी घेतला. पाचपैकी तिघे थोड्या वेळात येतो असे सांगून गुरू आणि २१ वर्षीय तरुणीला स्पामध्ये सोडून तेथून निघून गेले. ते तिघे बाहेर पडल्यानंतर १० मिनिटांनी दोन अनोळखी व्यक्ती स्पामध्ये आल्या आणि त्यांनी गुरूवर धारधार शस्त्रांनी वार करून पळ काढला. त्या हल्ल्यात गुरूचा मृत्यू झाला. गुरूविरोधातही १० गुन्हे दाखल होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा…कोकणातील रेल्वेगाड्यांना फटका

याप्रकरणी स्पाचा मालक संतोष शेरेकर याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय याप्रकरणात मोहम्मद फिरोज अन्सारी याला नालासोपारा येथून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच राजस्थान येथील कोटा रेल्वे स्थानकावरून संशयित शाकीब अन्सारीसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते रेल्वेने दिल्लीला जात होते. वाघमारेच्या हत्येसाठी सहा लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती समजली असून पोलिस त्याची पडताळणी करत आहेत.