मुंबई: दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्यांमध्ये जाहिरातीसाठी असलेल्या टिव्हीवरही शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. मात्र, परवानगी न घेताच हे प्रक्षेपण करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकल गाड्यांमध्ये करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी बसवण्यात आलेल्या एलईडी टिव्हीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपण सुरू होताच प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आणि पश्चिम रेल्वेला ट्विट करुन याची माहिती देण्यात आली. तसेच काहींनी अशा जाहिराती करणे योग्य नसल्याचे सांगून समाजमाध्यमांवर निषेध नोंदवला. मुळातच जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी असलेल्या या टिव्हीवर राजकीय सभेचे थेट प्रक्षेपण करता येऊ शकत नाही. मात्र कंत्राटदाराने कराराचा भंग करून हे प्रक्षेपण केल्याचे समोर आले आहे. रेल्वेतील डब्यांमध्ये असलेल्या टीव्हीवर राजकीय स्वरुपाची कोणतीही जाहिरात प्रदर्शित करता येऊ शकत नाही. शिंदे यांच्या सभेच्या प्रक्षेपणाची परवानगीही रेल्वेकडून देण्यात आली नव्हती. याप्रकरणी कंत्राटदाराकडून खुलासा मागवण्यात आला आहे. त्याचबरोबर आता कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. प्रथमदर्शनी, लोकल डब्यातील टिव्हीवर दसरा मेळाव्यातील सभेचे दहा ते पंधरा मिनिटे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. प्रक्षेपण सुरू झाल्याची माहिती मिळताच ते बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.