राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात 

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम‘ या पुस्तकास जाहीर झालेला  २०२१चा  अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. 

 या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. साहित्यामध्ये लेखनाचे स्वातंत्र्य असते. परंतु ज्यावर बंदी आहे, ते लिहिता येत नाही. बंदी घालण्याची एक वेगळी प्रक्रिया असते. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावर बंदी नसली तरी राज्यात नक्षलवादाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. नक्षलवाद मोडून काढणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

कोण आहेत कोबाद गांधी? 

सत्तरच्या दशकात समाजातील उपेक्षित व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या नक्षल चळवळीत शहरातील अनेक तरुण सामील झाले. उच्चशिक्षण घेतलेले मुंबईचे कोबाद गांधी त्यातले एक. त्यांनी या चळवळीसाठी शहरी भागात बरीच वर्षे काम केले. याच बळावर ते सध्या प्रतिबंधित असलेल्या भाकप (माओवादी) या पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य बनले. त्यांच्या दिवंगत पत्नी अनुराधा गांधी आधी शहरात व शेवटच्या काळात जंगलात सक्रिय होत्या. १७ सप्टेंबर २००९ कोबाड गांधी यांना नक्षली कारवायात सहभागी झाल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. तुरुंगातील वास्तव्यात त्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’. यात त्यांनी नक्षलींवर बरीच टीका केली आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध होताच चळवळीने त्यांना पक्षातून काढून टाकण्याची घोषणा केली.

Story img Loader