मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुनस्र्थापित करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समर्पित आयोगाकडून ओबीसींची शास्त्रीय सांख्यिकी माहिती (इम्पीरिकल डाटा) जमा करण्याचे काम सुरू आहे; परंतु केवळ आडनावावरून जात गृहीत धरणे चुकीचे आणि गंभीर आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आयोगाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात पटोले यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ओबीसींच्या संदर्भातील माहिती गोळा करण्याचे कामही सुरू आहे. पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. एकाच आडनावाचे लोक विविध जातींत आहेत. ही पद्धत शास्त्रोक्त नाही, या पद्धतीने माहिती गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष घालून, संबंधितांना ओबीसींची योग्य व अचूक माहिती जमा करण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी विनंती नाना पटोले यांनी पत्रात केली आहे.