मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील १२३ पैकी १०० आरोपींना जुलै २००७ मध्ये विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्या. त्यात प्रमुख आरोपी याकूब मेमनसह आरडीएक्स स्फोटके विविध ठिकाणी ठेवणाऱ्या १२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २० जणांना जन्मठेप आणि ६० हून अधिक गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षा ठोठावण्यात आल्या.
टाडा न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताना फाशीची शिक्षा झालेल्या एका आरोपीसह अनेक आरोपी मरण पावले. फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांपैकी शोएब घन्सार, असगर मुकादम, शाहनवाझ कुरेशी, अब्दुल गनी इस्माईल तुर्क, परवेझ शेख, मोहम्मद इक्बाल मोहम्मद युसूफ शेख, मोहम्मद फारुक पावले, मुश्ताक तरानी, फिरोज मल्की, झाकीर हुसेन, अब्दुल अख्तार खान या १० आरोपींच्या फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २०१३ रोजी जन्मठेपेत परावर्तित केली. तर केवळ याकूब मेमनचा बॉम्बस्फोटातील सहभाग हा महत्त्वाचा असून त्याने हा कट अमलात आणण्यासाठी आपला भाऊ टायगर मेमनसह पावले टाकली, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला होता.
याकूबच्या कुटुंबातील चार जणांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या, तर तिघांची मुक्तता करण्यात आली होती. एवढय़ा मोठय़ा संख्येने आरोपी असलेल्या आणि प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्यात फाशीची शिक्षा अमलात येणारा याकूब मेमन हा एकमेव गुन्हेगार ठरला आहे.
बॉम्बस्फोट खटल्यात फाशी होणारा याकूब एकमेव गुन्हेगार
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील १२३ पैकी १०० आरोपींना जुलै २००७ मध्ये विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्या. त्
First published on: 30-07-2015 at 04:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yakub is first accused in 93 blast case get death penalty