१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमनला पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३० जुलैला फासावर लटकावले जाईल, असे गृहविभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. फाशी वाचविण्यासाठी याकूबच्या वतीने धडपड सुरू असून सर्वोच्च न्यायालयात निर्णय दुरुस्ती याचिका (क्युरेटिव्ह पिटिशन) आणि राज्यपालांकडे दयेचा अर्ज करण्यात आले आहेत. पण सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊनच याकूबला फाशी दिले जाईल, असे संबंधितांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस हे या संदर्भात २९ जुलै रोजी विधिमंडळात निवेदन करणार आहेत.
याकूबला ३० जुलै रोजी नागपूर कारागृहात पहाटे फाशी दिले जाणार असून त्याची सर्व तयारी करण्यात येत आहे. मात्र फाशीपासून वाचविण्यासाठी याकूबतर्फे विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याने आणखी एका मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून राज्यपालांकडेही दयेचा अर्ज सादर केला आहे. राज्यपालांनी सरकारचा अभिप्राय मागितला असून हा अर्ज फेटाळून लावण्याची शिफारस त्यांना करण्यात येत असल्याची माहिती या सूत्रांनी दिली.
सरकारची तयारी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधि व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी आणि उच्चपदस्थांशी या संदर्भातील विविध बाबींवर चर्चा केली. सर्व कायदेशीर आक्षेप व अडथळे दूर करून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३० जुलैला फाशी देण्यासाठी सरकारने पावले टाकली आहेत.
याकूबची सर्वोच्च न्यायालयात याचिका
याकूब मेमन याने फाशीच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या शिक्षेविरुद्धचे सर्व कायदेशीर उपाय अद्याप वापरून झालेले नसून, आपण महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयेची याचना केली असल्याचे याकुबने त्याच्या याचिकेत म्हटले आहे.

Story img Loader