माजी महिला व बालकल्याणमंत्री आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारच्या महिला धोरणावर बोलताना व्यक्तिगत अनुभव सांगितला. हा अनुभव सांगताना त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. “पतीचं निधन होऊन १८ वर्षे झालीत. अजूनपर्यंत माझ्या पोरांच्या हक्काची संपत्ती त्यांच्या नावावर झाली नाही,” अशी खंत यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केली. ते बुधवारी (७ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होत्या.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, “माझे यजमान गेल्यावर मला एक संघर्ष करावा लागला. मी तर मोठ्या घरातील होती, मोठ्या घरात माझं लग्न झालं होतं. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करता मी फार वंचित कधीच नव्हते.”
“असं असूनही माझ्या मुलांची नावं सातबारावर लावण्यासाठी माझ्यासारख्या महिलेला आपल्या देशात अजूनही संघर्ष करावा लागतो,” असं मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.
“अजूनपर्यंत माझ्या पोरांच्या हक्काची संपत्ती त्यांच्या नावावर झाली नाही”
यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या, “आज माझ्या यजमानांना जाऊन १८ वर्षे झालीत. अजूनपर्यंत माझ्या पोरांच्या हक्काची संपत्ती त्यांच्या नावावर झाली नाही. महिलांबद्दलच्या कायद्याची ही स्थिती आहे.”
हेही वाचा : एकनाथ शिंदे धमकी प्रकरणावर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या “आजकाल मुख्यमंत्र्यांनाही…”
“हे महिला आणि बालकल्याणमंत्री राहिलेली महिला सभागृहाच्या पटलावर आणते आहे. मला जर हा त्रास होत असेल, तर सर्वसामान्य महिलांना काय त्रास होत असेल हा विचार सरकार करूही शकत नाही,” असं मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.