बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धतीत झालेले मोठे बदल यामुळे यंदा दहावीत गेलेला विद्यार्थीवर्ग, त्यांचे पालक आणि काही अंशी शिक्षकही दहावीच्या परीक्षेच्या नेमक्या स्वरूपाबाबत संभ्रमात आहेत. ही साशंकता, चिंता दूर करून विद्यार्थ्यांना या परीक्षेला अधिक आत्मविश्वासाने आणि सकारात्मक पद्धतीने सामोरे जाता यावे, यासाठी दै. ‘लोकसत्ता’ याही वर्षी ‘यशस्वी भव!’ हा दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर उपक्रम सुरू करीत आहे. या लेखमालेतील मार्गदर्शनपर लेखांना आजपासून प्रारंभ होईल. शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या या टप्प्यातील विद्यार्थ्यांची  वाटचाल सुकर व्हावी, यासाठी दै. ‘लोकसत्ता’ गेली १६ हून अधिक वर्षे ‘यशस्वी भव!’ उपक्रम राबवीत आहे. यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात झालेले बदल आणि परीक्षापद्धतीचे वेगळेपण या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शनाची नितांत गरज आहे आणि ही निकड लक्षात घेत यंदाही दै. ‘लोकसत्ता’ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धतीनुसार ‘यशस्वी भव!’ उपक्रम राबविणार आहे. यात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणितासह सर्व विषयांचे मार्गदर्शन केले जाईल, तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध होईल. यासाठी अनुभवी, तज्ज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या लेखमालेत सोमवार ते शुक्रवार मराठी माध्यम व शनिवार-रविवार इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी लेख प्रसिद्ध केले जाणार आहेत. दहावीचे वर्ष हे तणावपूर्ण न राहता खेळीमेळीने, तज्ज्ञांच्या सोबतीने जाण्यास ‘यशस्वी भव!’ निश्चितच उपयुक्त ठरेल.