प्रकल्पावर काम सुरू; लवकरच रसिकांच्या भेटीला
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे श्राव्य माध्यमातील ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र रसिकांच्या भेटीला येणार आहे. ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ या संस्थे’च्या सहकार्याने ‘नेशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ या संस्थेने या प्रकल्पावर काम सुरू केले आहे. श्राव्य माध्यमात सीडी रुपात उपलब्ध असलेले हे आत्यचरित्र आता लवकरच ऑनलाइन स्वरुपात एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
नुकत्याच यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र श्राव्य (ऑडिओ) माध्यमात सीडीरुपात उपलब्ध करण्यात आले आहे. मुख्यत: अंध विद्यार्थ्यांपर्यंत मराठी तसेच इतर भाषेतील उत्तम साहित्य पोहोचावे, यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.
यासाठी तब्बल ५०० सीडी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या आत्मचरित्राचे ध्वनिमुद्रिणाचे काम नेशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या स्टुडिओत करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र तीन भागांत आहे. यातील ‘जडणघडण’, ‘वैचारिक आंदोलने’ आणि ‘निवड’ हे तीनही भाग रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
”संभाषणशैलीतील मनमिळाऊ, सुसंस्कृत, तत्त्वनिष्ठ आणि प्राजंळ प्रचार ही माझी मोठी शक्ती आहे, असे माझ्या लक्षात आले; आणि या सर्व वादळात जनतेच्या आशीर्वादाने व माझ्या कार्यकर्त्यां मित्रांना संघटित सहकार्याने मी अपराजित ठरलो.” या यशवंतरावांच्या आत्मचरित्रातल्या त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलेल्या गोष्टी रसिकांना ऐकता येणार आहेत, असे सांगण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णकाठ’ हे गाजलेले आत्मचरित्र श्राव्य माध्यमात उपलब्ध झाले आहे. याचा उपयोग अनेक वाचक-रसिकांसह अंध मुलांनाही होणार आहे. आपल्याकडील उत्तम साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्न करत असते. ब्रेनलिपीत पुस्तक निर्मितीही केली जात आहे. या सर्वात पुढचा भाग म्हणजे आता हे आत्मचरित्र ऑनलाइनस्वरुपात उपलब्ध होणार आहे.
– हेमंत टकले, कोषाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई</strong>