मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे डिजिटल विद्यापीठात रुपांतर करण्यात येणार आहे. डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयत्न असून हा प्रयोग देशातील सर्व विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संपूर्ण महाराष्ट्रात लवचिक, आकर्षक व दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पहिले डिजिटल विद्यापीठ उभारण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची निवड केली आहे. डिजिटल विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा व्यासपीठ म्हणून वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पहिले डिजिटल विद्यापीठ होण्याचा मान यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला मिळणार आहे. डिजिटल विद्यापीठ स्थापन करताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधील तांत्रिक पायाभूत सुविधा वाढवणे, तसेच अन्य विद्यापीठांच्या तुलनेत या डिजिटल विद्यापीठात उच्च गुणवत्ता आणि आकर्षक विषय विकसित करण्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून भर देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> कल्याण बालिका हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम सरकारी वकील

डिजिटल विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला लवचिक आणि सुलभ शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे डिजिटल विद्यापीठात रुपांतर करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. तसेच हे विद्यापीठ देशभरात डिजिटल शिक्षणासाठी एक नवीन मानक स्थापित करेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

प्राध्यापकांना ऑनलाईन प्रशिक्षण

डिजिटल विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थ्यांना उत्तम आणि चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापाीठातील सर्व प्राध्यापकांना अध्यापनासाठी उच्च दर्जाचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे ऑनलाईन वर्गातून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय सहज व सोप्या पद्धतीने शिकविणे प्राध्यापकांसाठी सहज शक्य होणार आहे.

अभ्यासक्रम तंत्रस्नेही

शिक्षण अधिक सुलभ व्हावे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील सर्व पारंपरिक अभ्यासक्रमांचे रूपांतर संवादात्मक डिजिटल स्वरूपात करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध होण्याबरोबरच ते त्यांच्या मोबाइल व लॅपटॉपवरही मिळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwantrao chavan open university to be converted into a digital university zws