यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार होतेच, पण त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत १९६२ ते ६६ या काळात संरक्षणमंत्रिपद समर्थपणे सांभाळले आणि त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या युध्दात विजय मिळविता आला. केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम करताना त्यांनी आपले कर्तृत्व दाखविले. सर्वाना बरोबर घेवून जाणारा व सहमतीचे राजकारण करणारा तो एक कुशल प्रशासक नेता होता, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कामगिरीचा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी गौरव केला.
यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांचा समारंभ एनसीपीए सभागृहात झाला. यावेळी बोलताना राष्ट्रपती मुखर्जी यांनी चव्हाण यांच्या कर्तबगारी व कामगिरीची उदाहरणे देत गौरवोद्गार काढले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना जनभावनेची दखल घेवून आपल्या राजकीय चातुर्याने त्यांनी राष्ट्रीय नेत्यांना मुंबईसह मराठी भाषिकांच्या राज्याच्या निर्मितीची आवश्यकता असल्याचे पटवून दिले. उद्योगक्षेत्र व उद्योगपतींचा विश्वास मिळविणे, लोकांना शांत करणे व राष्ट्रीय नेत्यांना स्वतंत्र राज्याची गरज दाखवून देणे, हे अवघड काम यशवंतरावांनी पार पाडले, असे राष्ट्रपती मुखर्जी यांनी सांगितले.  
कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे शिल्पकार ई श्रीधरन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व रोख पाच लाख रूपये असे त्याचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावरील टपाल पाकीट आणि ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्राच्या ऑडिओ बुकचे प्रकाशन राष्ट्रपतींनी केले. ‘फ्लो ऑफ लाईफ-यशवंतराव चव्हाण’ या इंग्रजीतील पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी यावेळी केले. शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

Story img Loader