लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपरमध्ये महाकाय जाहिरात फलक कोसळून १७ जणांचा मृत्यू, तसेच गेटवे ऑफ इंडिया घारापुरी लेणी सागरी जलप्रवास मार्गावर नौदलाची बोट प्रवासी बोटीवर आदळून झालेल्या अपघातात १५ जणांना प्राण गमवावे लागले. मानवी चुका आणि यंत्रणेतील अनेक दोषांमुळे झालेल्या अपघातांचे मावळते वर्ष साक्षीदार ठरले.
घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर मे २०२४ मध्ये महाकाय फलक कोसळला. नियमांचे उल्लंघन करून हा जाहिरात फलक उभारण्यात आला होता. त्याची किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागली. याप्रकरणी ‘इगो मीडिया’ कंपनीचा संचालक भावेश भिंडे, कंपनीची माजी संचालक जान्हवी मराठे, जाहिरात फलकाच्या देखरेखीची जबाबदारी असलेला सागर पाटील आणि मान्यताप्राप्त स्थापत्य अभियंता मनोज संघू यांना अटक करण्यात आली.
याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्याप्रकरणी जुलैमध्ये चारही आरोपींविरोधात सुमारे ३,३०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी १०२ जणांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यात वरिष्ठ अधिकारी कैसर खालिदसह दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाकाय फलकाला देण्यात आलेली परवानगी वादात अडकली आहे.
आणखी वाचा-अजित पवारांचे सूचक मौन, देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय टीका
जीवरक्षक प्रणाली बंधनकारक
‘गेटवे ऑफ इंडिया’हून घारापुरी लेण्यांच्या दिशेने जाणाऱ्या ‘नीलकमल’ प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली आणि या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे बोटीच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी संख्या, जीवरक्षक जॅकेट उपलब्ध नसणे, प्रवासी बोटींच्या मार्गावर नौदलाकडून नवीन बोटीचे परिक्षण करणे असे विविध मुद्दे उपस्थित झाले. याप्रकरणानंतर गेट वे ऑफ इंडिया-मांडवादरम्यान चालणाऱ्या बोटींची मेरिटाइम बोर्ड आणि पोलीस प्रशासनाने सुरक्षा तपासणी सुरू केली. बोटीवरील सर्व प्रवाशांना पुरतील इतकी जीवरक्षक प्रणाली उपलब्ध आहेत वा नाही, याची पडताळणी करण्यात आली. बोटींवरील प्रवाशांना जीवरक्षक प्रणाली सक्ती करण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा मेरीटाइम बोर्डाने बोट वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना दिला.
कंत्राटी बसचालकांची चूक
९ डिसेंबर रोजी रात्री दहाच्य सुमारास कुर्ला बेस्ट बस स्थानकातील अपघातात नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात वाहनातील बिघाड, चालकाची चूक असे अनेक आरोप करण्यात आले. कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या ‘एल’ विभाग कार्यालयासमोर ९ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगातील ‘बेस्ट’बसने अनेक पादचारी आणि खासगी वाहनांना धडक दिली. या अपघातात ४९ जण जखमी झाले होते. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षात ‘बेस्ट’ बसचे सुमारे १२ गंभीर अपघात झाले. त्यातील बहुसंख्य अपघात कंत्राटी बस चालकांच्या चुकांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे.
आणखी वाचा-निवडणूक वर्षात ७२ कोटी ७० लाख लिटर मद्यविक्री !
नशेचा अंमल
पुण्यातील तरुणाने भरधाव वेगात आलिशान मोटरगाडी चालवताना केलेल्या अपघातामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना मुंबईतही धनाढ्य तरुणाने नशेत केलेल्या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. आरोपी सुमारे दीड किलोमीटर दूरवर त्यांना मोटरीसोबत फरफटत नेले. त्यानंतर वरळी सागरी सेतूजवळ महिलेचा मोटरगाडीखाली अडकलेला मृतदेह काढून आरोपी पळून गेला. पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. ७१६ पानांच्या या आरोपपत्रात ३८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या एक टॅक्सी चालकालाही पोलिसांनी शोधून त्याचा न्यायाधिशांपुढे जबाब नोंदवला होता. मुख्य आरोपी मिहिर शहा, राजऋषी बिडावत व मिहिर शहाचे वडील राजेश शहा यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणातील राजेश शहा हे शिंदे गटाचे तत्कालीन पदाधिकारी असल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण काही काळ तापले होते.
अननुभवी, अल्पवयीन
- गोरगाव पूर्व येथे दुचाकीवरून शाळेत जाणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला, तर तिचे वडील जखमी झाले होते. चालक उपलब्ध नसताना आरोपी डंपर मालकाने हेल्परला डंपर चालवण्यासाठी दिला. हेल्परकडे चालक परवानाही नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हेल्परसह डंपर मालकालाही अटक केली.
- याशिवाय मे महिन्यात माझगाव येथे दुचाकी चालविणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाने अपघात केला. या अपघातात समोरून दुचाकीवरून येणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगाही किरकोळ जखमी झाला. याप्रकरणी सर जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलाची वैद्याकीय चाचणी करून त्याची रवानगी डोंगरी निरीक्षणगृहात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली.