मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासूच मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणवार पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

 

मुंबईच्या चेंबूरमधील आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये मध्यरात्री अतिपावसामुळे डोंगर पायथ्याशी बांधलेल्या भिंतीवर दरड कोसळली. त्यामुळे ही भिंत लागूनच असलेल्या घरांवर कोसळली आणि मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. काल मध्यरात्री १२.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. एनडीआरएफचं पथक अजूनही घटनास्थळी असून मलबा हटवण्याचं काम सुरू आहे.

वाचा काय घडलं चेंबूर आणि विक्रोळीमध्ये!

दरम्यान, दुसरीकडे विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरामध्ये झोपडपट्टीमध्ये एक दुमजली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यात दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अजूनही मलबा हटवण्याचं काम सुरू आहे.

काय घडलं मध्यरात्री?

गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा हजेरी लावली. मध्यरात्री १२ वाजल्यापासून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या तुफान पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले होतो. रात्रभर कोसळल्यानंतर सकाळच्या सुमारास पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही भागांमधून पाणी ओसरायला सुरुवात झाली. या पावसामुळे दहिसर नदीचं पाणी बोरीवली पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलं होतं. ते देखील ओसरू लागलं आहे. अजूनही मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा रेल्वेच्या वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला आहे.