मुंबईत गुरुवारी रात्रीपासून धुवांधार कोसळणाऱ्या पावसाची ‘इनिंग’ रविवारीही कायम राहिली तर रविवारी योग दिवस साजरा कसा करायचा, असा प्रश्न आता शाळांसमोर पडला आहे. त्यात काही शाळांनी मोठय़ा वर्गातील मुलांबरोबरच पहिली ते चौथीच्या चिमुकल्या मुलांनाही योग दिवसाकरिता सकाळी पावणेसातला हजर राहण्याचा फतवा काढल्याने पालकांमध्ये नाराजी आहे.
पावसाची थांबण्याची चिन्हे नसल्याने राज्य सरकारने शनिवारीही शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे, रविवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या योग दिनाचे आयोजन कसे करायचे, असा प्रश्न शाळांसमोर आहे. अनेक शाळा मैदानावर योग दिनाचे आयोजन करणार आहेत. परंतु, पावसाची रिपरिप जरी कायम राहिली तरी मैदानावरील या साजरीकरणाला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे वर्गात किंवा शाळेच्या सभागृहात आम्हाला योग दिनाचे आयोजन करावे लागेल, असे ‘महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघा’चे प्रवक्ता प्रशांत रेडीज यांनी सांगितले.
शाळांसमोर ही अडचण असताना चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पालक असलेल्यांसमोर वेगळाच प्रश्न आहे. अशा दिवसांकरिता हजेरी राहण्याची सक्ती पूर्वप्राथमिक किंवा प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना केली जात नाही. परंतु, काही शाळांनी या मुलांनाही ‘आसने’ घालण्यासाठी हजर राहण्याचे फतवे काढले आहे.
‘भान ठेवा..’
ठाण्यातील एका शाळेत तर पहिली ते चौथीच्या मुलांनाही पावणेसातला हजर राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. ‘या प्रकारच्या उपक्रमांच्या आयोजनामागील कल्पना व विचार ज्या वयाच्या मुलांना कळतील अशा पाचवी किंवा सातवीच्या पुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांनाच त्यात सहभागी करून घ्यायला पाहिजे. शाळांनी तर याचे भान ठेवलेच पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत ‘महाराष्ट्र मुख्याध्यापक महासंघा’चे प्रशांत रेडीज यांनीही याला विरोध दर्शविला.
मुंबईतील योग दिवस ‘पाण्यात’ जाणार?
मुंबईत गुरुवारी रात्रीपासून धुवांधार कोसळणाऱ्या पावसाची ‘इनिंग’ रविवारीही कायम राहिली तर रविवारी योग दिवस साजरा कसा करायचा, असा प्रश्न आता शाळांसमोर पडला आहे.
First published on: 20-06-2015 at 04:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga day turn into rainy day in mumbai