पक्षाचे वरिष्ठ नेते योगेंद्र यादव यांच्या मुंबईतील जाहीर सभेच्या निमित्ताने आम आदमी पक्षाच्या चकाला येथील कार्यालयात बुधवारी सळसळते चैतन्य अवतरले. योगेंद्र यादव यांच्यासह ईशान्य मुंबईतील उमेदवार मेधा पाटकर आणि नागपूरच्या उमेदवार व राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनीही आज या कार्यालयात हजेरी लावली. त्यामुळे डोक्यावर टोप्या चढवलेल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांची दुपारपासून येथे वर्दळ वाढली.
‘मै आम आदमी हूँ’ अशी अक्षरे असलेल्या इटुकल्या टोप्या चढवलेल्या लहान मुलांना घेऊनदेखील लोक आले होते. तथापि, चौकशी करूनच कार्यकर्त्यांना कार्यालयात प्रवेश देणारी यंत्रणा कार्यरत होती. अनेकांनी मेधा पाटकर, योगेंद्र यांच्यासह आपले फोटो काढून घेतले.
यासोबतच प्रत्यक्ष भेट झालेल्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांचा संवाद सुरू होता. काही कार्यकर्ते स्तुतीसुमने सोबत घेऊनच दाखल झाले होते. काहींनी अंजली दमानिया यांच्याभोवती कोंडाळे करून त्यांच्यावर स्तुतिवर्षांव सुरू केला.. ‘गडकरी नागपुरात लोकसभा काय लढणार, ते वॉर्डातूनही कधी निवडून येणार नाहीत’, असे एक कार्यकर्ता तावातावाने अंजली दमानियांना सांगत होता. मात्र यामुळे फार वेळ सुखावण्याची त्यांना संधी मिळाली नाही. ‘तुम्ही गेले दोन महिने आमचा फोनही उचललेला नाहीत’ अशी तक्रार दक्षिण महाराष्ट्रातून आलेल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांने केली. ‘तुम्ही तर आताच खासदार झालात असे वाटते’, असा टोला त्याने लगावला तेव्हा अंजलीबाईंना काढता पाय घ्यावा लागला.
 नेत्यांचे आगमन होऊ लागले, तशी कार्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू झाली. फलकांसह हातात ‘झाडू’ हे निवडणूक चिन्ह हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. या साऱ्या गर्दीची पावले नंतर सभास्थळाकडे चालू लागली आणि कार्यालयातील चैतन्य ओसरले.