Taj Mahal And Ram Mandir Workers : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, ताज महाल बांधणाऱ्या मजुरांचे हात कापण्यात आले होते तर, अयोध्येतील राम मंदिर बांधणाऱ्या मजुरांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मान केल्याचे म्हणत, मजुरांना इतिहासात कशी वागणूक मिळाली आणि सध्या कशी वागणूक मिळते याबाबत तुलना केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी रात्री मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते.

याबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “तुम्ही पाहिले असेल २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिर बांधणाऱ्या सर्व मजुरांचा कसा सन्मान करत होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी मजुरांवर फुलांचा वर्षाव करत होते. तर, दुसरीकडे ताज महाल बांधणाऱ्या मजुरांचे हात कापण्यात आले होते.”

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी असेही नमूद केले की, इतिहासात कापड उद्योगातील अनेक उत्कृष्ट कारागिरांचे हातही कापले गेले होते. ज्यामुळे संपूर्ण परंपरा आणि वारसा नष्ट झाला.

“आज भारतात श्रमिकांचा आदर केला जात आहे. त्यांना सर्व प्रकारचे संरक्षण मिळत आहे. दुसरीकडे मात्र, असे राज्यकर्ते होऊन गेले ज्यांनी मजुरांचे हात कापले आणि उत्कृष्ट कापड कारागिरांचा वारसा आणि परंपरा नष्ट केली,” असे आदित्यनाथ वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

ताज महालच्या मजुरांचे हात कापल्याचा दावा

१७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने ताजमहलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मजुरांचे हात कापण्याचे आदेश दिल्याचा दावा केला जातो. पण, हा दावा सिद्ध करणाऱ्या कोणत्याही ऐतिहासिक नोंदी आजपर्यंत सापडल्या नाहीत.

भारताचा इतिहास आणि वारसा याबद्दल पुढे बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, “काही लोकांना देशाची प्रगती किंवा भारतीयांना जागतिक स्तरावर मिळत असलेला आदर सहन होत नाही. जे आज भारताचा वारसा सांगत आहेत, ते देशाच संस्कृती अस्तित्वात आली तेव्हा जन्मलेही नव्हते.”

हे ही वाचा : अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी, आई आणि भावाला अटक

पाकिस्तानला फटकारले

या कार्यक्रमात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पाकिस्तानशी तुलना करत भारताने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीवरही भाष्य केले. ते म्हणाले
“भारतात एन्सेफलायटीसची लस येण्यासाठी १०० वर्षे लागली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या नऊ महिन्यांत कोविड-१९ लस आणली. आज पाकिस्तान भीक मागत आहे, तर आम्ही ८० कोटी नागरिकांना जात-धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता मोफत रेशन देत आहोत.”

Story img Loader