नाटकांच्या जाहिरातींवर नजर टाकल्यावर नेहमीच्या नाटकांच्या गर्दीत ‘चार योनींची गोष्ट’, ‘पांढरपेशी वेश्या’ अशी एकापाठोपाठ नावे दिसू लागतात तेव्हा अशा नाटकांच्या निर्मितीमागे सवंग लोकप्रियता मिळवणे हा एकमात्र हेतू आहे का, अशी शंका मनात येणे साहजिक आहे. मात्र, स्त्री-पुरूष संबंधातील भावनिक गुंतागुंतीबरोबरच त्यांच्या लैंगिक संबंधातील परखड वास्तव मांडणे आजच्या काळात गरजेचे वाटत असल्यानेच अशा धाडसी नाटकांची निर्मिती केली जात असल्याचे नाटककार म्हणतात.  
‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे नाटक आता कित्येकांना माहिती झाले आहे. मात्र, ‘त्या चार योनींची गोष्ट’ या नाटकाचे नाव वाचल्यानंतर कित्येकांच्या भुवया उंचावल्या. स्त्रियांच्या लैंगिक गरजा, अपेक्षा या वेगळ्या असतात. कित्येकदा सवयीने होणारे काही मिनिटांचे शरीरसंबंध पुरूषांना सुखावत असले तरी स्त्रिया समाधानी नसतात. पस्तीस-चाळिशीतील स्त्रियांच्या लैंगिक गरजा आणि समस्या ‘त्या चार योनींची गोष्ट’ या नाटकातून मांडली असल्याची माहिती या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक प्रा. नितीनकुमार पाटील यांनी दिली. आपल्या नाटकाला स्त्री आणि पुरूष दोघांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून सध्या नाटकाचा ३९ वा प्रयोग यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. नाटकाचा विषय थेटपणे नावातून सांगितला तरच प्रेक्षक नाटकाकडे ओढला जाईल त्यामुळे ‘योनीची गोष्ट’ असा थेट उल्लेख के ल्याचे ते सांगतात. ‘प्रपोजल’, ‘पांढरपेशी वेश्या’, ‘रिलेशन’ आणि अगदी ‘तो अलबेला’ असे नाव असलेल्या नाटकातही लैंगिक संबंधामुळे घडलेल्या प्रेमाची गोष्ट आहे.
‘तो अलबेला’ या नाटकाच्या जाहिरातीतच नाटकातला एक धीट संवाद वापरण्यात आला आहे. याबाबत बोलताना, नाटकाचे दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांनी ही कथा प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांना दैवत मानणाऱ्या एका तरुण चित्रकाराची असल्याचे सांगितले. ‘नग्न चित्रकारिता’ हा त्याचा आवडीचा विषय आहे. आणि त्यासाठी एका मध्यमवयीन, विवाहित स्त्रीला मॉडेल होण्याविषयी तो विचारणा करतो. त्यावर त्या स्त्रीची म्हणून जी प्रतिक्रिया आहे, त्यातून त्यांच्यात निर्माण झालेले वेगळेच नाते, तिने घेतलेला पुढाकार असे अनेक कंगोरे नाटकात आहेत. मात्र, नाटकाला प्रेक्षक हवे असतील तर जाहिरातीमधून किंवा नाटकाच्या नावातूनच विषय धीटपणे मांडावा लागतो, असे इनामदार यांनी सांगितले. अगदी ‘प्रपोजल’सारख्या चांगल्या नाटकासाठीही नायिकेचे सूचक पाठमोरे छायाचित्र प्रसिद्ध केले गेले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या नाटकांचे विषय चांगले आहेत त्यामुळे नाटक पाहिल्यावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण, त्यासाठी लोकांनी नाटक पाहायला येणे गरजेचे आहे, असे ‘त्या चार योनींची गोष्ट’ या नाटकाचे निर्माते संतोष कोचरेकर यांनी सांगितले.
या नाटकाला सुरुवातीला कोणीच प्रतिसाद दिला नव्हता. पण, पुण्यात मी स्वत: दोनदा हे नाटक पाहिले होते. अखेर, आपले मित्र आणि नाटय़निर्माते दिनू पेडणेकर यांना हे नाटक दाखवल्यानंतर त्यांनी हे नाटक मुंबईत आणलेच पाहिजे, असा विश्वास दिला. त्यानंतरच ‘त्या चार योनींची गोष्ट’ हे नाटक मुंबईत आले आणि त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कोचरेकर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा