राजकारणात काम करताना कधीही बेसावध राहू नका, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सातव्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांना केले. स्थापनेच्या दिवशी महाराष्ट्रात पसरलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष एकमेव पक्ष आहे, असे सांगून काहीही झाले, तरी महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणारच याचाही पुनरुच्चार राज ठाकरेंनी यावेळी केला.
राज्यभर सुरू असलेल्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सातव्या वर्धापनदिनी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पक्षप्रमुखाकडून पक्षाची ध्येय, धोरणांबाबत विस्तृत दिशा मिळण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा असते. मात्र, ‘काल सकाळी वर्तमानपत्रात छापून आलेल्या टाळीच्या बातमीला मी दुपारी टोला दिला’, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया देत राज ठाकरेंनी विशालयुतीबाबत अधिक भाष्य करणे टाळले. मतदार याद्यांमधून मराठी माणसांची नावे गायब झाल्यास आपली माणसे निवडून कशी येणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधून मराठी मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळली जात आहेत, असा आरोप करीत या सर्वाचा वेळीच निकाल लावण्यासाठी लवकरात लवकर कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
टाटा उद्योगसमुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी शुक्रवारी दुपारी राज ठाकरे यांची भेट घेतली. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या आदल्यादिवशी रतन टाटांनी माझी भेट घेतली, हा पक्षासाठी शुभसंकेत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. हा एकट्या राज ठाकरेंचा सन्मान नसून, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.