मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत रस्ते अपघातांत जीव गमावलेल्या वाहनचालकांपैकी सरासरी २५ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक असल्याचे महामार्ग पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. कमावत्या वयातील चालकांच्या मृत्यूचे हे प्रमाण ५७ टक्के आहे.
गेल्या वर्षी रस्ते अपघातांत ६,७२९ चालकांचा (स्त्री आणि पुरुष) मृत्यू झाला. त्यापैकी ३,८५२ हे २५ ते ४५ वयोगटातील, तर २,०१४ चालक २५ ते ३५ वयोगटातील होते. याशिवाय, मृत्यू झालेल्या चालकांमध्ये १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. अपघातांत प्राण गमावणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील चालकांची संख्या १,४२७ एवढी आहे. तसेच अपघातात १०,१७९ चालक जखमी झाले. त्यापैकी २५ ते (पान ४ वर) (पान १ वरून) ४५ वयोगटातील संख्या ५,८९९ एवढी आहे. कमावत्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक आघात झाला आहे.
हेही वाचा >>> परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान; म्हणाले “अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री…”
यंदा जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या २४,३६० अपघातांत ११,१४९ चालकांचा मृत्यू झाला. त्यांत कोणत्या वयोगटातील किती चालकांचा मृत्यू झाला याचा तपशील यथावकाश जाहीर होणार असला तरी त्यातही कमावत्या वयातील व्यक्तींची संख्या अधिक असू शकते, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कर्त्यां व्यक्तींचा मृत्यू..
अपघातांतील मृतांच्या आकडय़ांवर कटाक्ष टाकला तर तरुण चालकांचे प्रमाण मोठे आहे. अपघातात प्राण गमावलेला हा चालक वर्ग २५ ते ४५ वयोगटातील आहे, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून अधोरेखित होते.
हेही वाचा >>> ‘कसला मर्द’ म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना शहाजीबापू पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले “माझ्या मर्दानगीचं वेड…”
कारणे काय? वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेदरकारपणा, वेगाची नशा ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघातांची संख्या वाढते. करोना साथीच्या काळात अनेक तरुणांना वाहन चालविण्याची मौज लुटता आली नाही, मात्र निर्बंध मागे घेताच तरुण चालकांनी वेगाची हौस भागवण्याच्या नादात आपले प्राण गमावले.
नव्या वाहनांना अधिक अपघात
गेल्यावर्षी अपघातग्रस्त झालेल्या वाहनांच्या संख्येत सर्वाधिक नवी आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाची वाहने आहेत. त्यांची संख्या ४,९४९ आहे. या वाहनांच्या अपघातात ५,३५१ जणांचा मृत्यू झाला, तर अपघातग्रस्त झालेल्या ५ ते १० वर्षांच्या वाहनांची संख्या ३,८२६ असून त्यांत ४१४६ मृत्यू झाले आहेत.