मुंबई : विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवणाऱ्या, भविष्यवेधी दृष्टिकोन आणि चाकोरीबाहेरची दिशा धरणाऱ्या युवा प्रज्ञावंतांना गौरवणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांची यंदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या युवा गुणिजनांना लवकरच समारंभपूर्वक सन्मानित केले जाईल.

गुणवत्ता, कालसुसंगतता आणि परिणाम अशी उत्कृष्टतेची त्रिसूत्री यंदाच्या तेजांकितांमध्ये दिसून येते, असे मत परीक्षक समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याचे यंदा सातवे वर्ष आहे. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२४’च्या परीक्षक समितीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ आमटे यांचा समावेश होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, केसरी टूर्स, न्याती ग्रुप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स आणि रिजन्सी ग्रुप हे सहप्रायोजक आहेत. लक्ष्य अकॅडमी पॉवर्ड बाय पार्टनर आणि प्राईस वॉटरहाऊस कूपर्स नॉलेज पार्टनर आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्याबाहेरूनही या पुरस्कारासाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज केले होते. या अर्जांची परीक्षक समितीद्वारे काटेकोरपणे छाननी करण्यात आली. प्रत्येक अर्जदाराच्या कामाचे स्वरूप, त्याचा परिणाम, विश्वासार्हता, कालसुसंगतता, गुणवत्ता, व्याप्ती असे अनेक निकष परीक्षकांनी विचारात घेतले. अर्जदारांनी दिलेल्या माहितीची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करण्यात आली. मोठ्या संख्येने अर्ज केलेल्या युवा प्रज्ञावंतांच्या कार्याची व्याप्ती आणि वैविध्य लक्षात घेत त्यातून मोजक्या विजेत्यांची निवड करण्याचे आव्हान परीक्षक समितीसमोर होते. युवकांनी कोणते आदर्श घालून दिले, कोणते मानदंड निर्माण केले, समाजावर आणि परिस्थितीवर या कार्याचा कोणता परिणाम होत आहे, संकल्पनेत नावीन्य किती अशा अनेक मुद्द्यांचा ऊहापोह परीक्षक समितीच्या बैठकीत झाला. कला व मनोरंजन, उद्योग, व्यवसाय, समाजसेवा, कायदा व प्रशासन, विज्ञान व संशोधन, क्रीडा अशा विभागांमध्ये तेजांकितांचा शोध घेण्यात आला.

नाविन्यतेला महत्त्व

विविध क्षेत्रात दर्जेदार काम करणाऱ्या मंडळींना शोधणे आणि त्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची थाप देणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा उपक्रम कौतुकस्पद आहे. या सर्व युवा मंडळींची इत्थंभूत माहिती आणि संबंधित कागदपत्रे गोळा करण्याचे काम ‘लोकसत्ता’ आणि इतर सहकारी संस्थांनी उत्तम केले आहे. त्यामुळे परीक्षकांनाही चांगली चर्चा करून वेगवेगळे पैलू तपासता आले. चांगले काम करणाऱ्या युवा मंडळींना या पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळते. इतरांना तसे कर्तृत्व दाखवण्याची प्रेरणा मिळते. आपण आर्थिकदृष्ट्या झपाट्याने प्रगती करीत आहोत. लोकसंख्या व सामूहिक शक्ती मोठी आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती म्हणजेच दरडोई उत्पन्न किती आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी युवा पिढीने आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान दिले पाहिजे. तसेच झपाट्याने बदलणाऱ्या काळात नाविन्यतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या डोक्यात येणाऱ्या नवीन संकल्पना पुढे नेण्याच्या दृष्टीने तयारी करावी. – डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

राज्याच्या कानाकोपऱ्यात गुणवत्ता

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराच्या निवड समितीत असणे, ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ही निवड प्रक्रयिा अतिशय पद्धतशीर आणि नि:पक्षपातीपणे होते. महाराष्ट्राची लोकसंख्या ही काही युरोपियन देशांपेक्षा मोठी आहे आणि इतक्या मोठ्या राज्याच्या कानाकोपऱ्यात खूप चांगले व प्रभावी काम करणारी माणसे राहतात, हे काम सर्वांसमोर आले पाहिजे. तरुण तेजांकित पुरस्कार सोहळा अशाच व्यक्तींना ओळख देतो. सध्या विविध क्षेत्रात वैविध्य आहे आणि अनेकजण नाविन्यपूर्ण काम करीत आहेत. – डॉ. पी. अनबलगन, सचिव, उद्याोग विभाग

युवा वर्गासाठी प्रेरणादायी

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा उपक्रम लक्षणीय व कौतुकास्पद आहे. विविध क्षेत्रात दर्जेदार काम करणाऱ्या चाळीशीच्या आतील माणसांना वेळीच हेरून भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार आहे. जेव्हा प्रकाशझोताच्या पलीकडे राहून काम करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळते, तेव्हा इतरांनाही प्रेरणा मिळते. दर्जेदार अर्जांमुळे विजेत्यांची निवड करणे अवघड होते. मात्र त्यातूनही आम्ही योग्य पद्धतीने विजेत्यांची निवड केली आहे. ज्यांना यंदा पुरस्कार मिळणार नाही, त्यांनी नाराज होऊ नका. खरे तर मुळात तुमच्याकडे इतरांना तसेच ‘लोकसत्ता’सारख्या अग्रगण्य वृत्तपत्राला काहीतरी सांगण्यासारखे आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे काम करीत रहा.

– प्रतिमा कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शिका

तेजांकित हे सदिच्छादूत

विविध क्षेत्रात दर्जेदार काम करणाऱ्या व्यक्तींना कामाची योग्य पोचपावती मिळणे आवश्यक असते. मराठी पत्रकारितेत विवेकी पत्रकारिता करणारे वृत्तपत्र ‘लोकसत्ता’तर्फे ‘तरुण तेजांकित’ हा उपक्रम राबविला जात आहे. ‘लोकसत्ता’कडून आपल्या कामाची दखल घेणे, ही मोठी गोष्ट आहे. सध्याची युवा पिढी ही बेरोजगारी व ताणतणावाने ग्रासलेली आहे. मात्र त्यापलीकडेही आपल्या महाराष्ट्रात काही युवा मंडळी वेगळे उत्तम काम करीत आहेत आणि ही मंडळी समाजापुढे आली की ते इतरांना प्रेरणा देणारे सदिच्छादूत बनतात. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराची निवड करताना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा समावेश असलेल्या निवड समितीत खुली चर्चा होऊन पारदर्शक पद्धतीने निवड करण्यात येते. कुठेही भावनेच्या भरात निवड होत नाही. सर्व अर्जांची व्यवस्थित छाननी, कागदपत्रे तपासून व सर्व गोष्टींची पडताळणी करून निवड केली जाते. – कौस्तुभ आमटे, सामाजिक कार्यकर्ते

गुणवत्ता वाढत आहे

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातून शेकडो अर्ज आले होते आणि या अर्जांची तज्ज्ञ समितीद्वारे काटेकोरपणे छाननी करण्यात आली. वर्षानुवर्षे अर्जांची संख्या व गुणवत्ता वाढत चालली आहे. त्यामुळे निवड प्रक्रयिाही आव्हानात्मक होत आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी व चर्चा करून तरुण तेजांकितांची निवड करण्यात आली आहे. आपण केलेल्या कामाची योग्य पोचपावती ही ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराच्या माध्यमातून मिळते, हे सातत्याने वाढणाऱ्या अर्जांच्या संख्येवरून समजते. – अल्पेश कांकरिया, प्राईस वॉटरहाऊस कूपर्स

Story img Loader