लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : आंतरराष्ट्रीय ट्रेडिंगच्या नावाखाली खासगी बँकेच्या व्यवस्थापकाची साडेपाच लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका तरूणाला अटक केली. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीत सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे.

तक्रारदार खासगी बँकेच्या बीकेसी शाखेत मुख्य व्यवस्थापक पदावर कामाला आहेत. तक्रारदाराचे त्यांच्याच बँकेत खाते असून ते त्यांच्या मोबाइल क्रमांकाशी संलग्न आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्यांनी फेसबुकवर आंतरराष्ट्रीय ट्रेंडिगबाबत जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीखाली देण्यात आलेल्या लिंकद्वारे तक्रारदार एका व्हॉट्स ॲप समुहामध्ये सामील झाले. त्या ग्रुपमध्ये आंतरराष्ट्रीय ट्रेंडिंगबाबत सूचना करण्यात येत होत्या. तक्रारदारांनी दोन महिने निरीक्षण केले असता त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे ट्रेडिंग केल्यास नफा होत असल्याचे दिसत होते. संबंधित समुहामध्ये नफा झाल्याचे स्क्रीन शॉर्ट पाठवण्यात येत होते. ते पाहून तक्रारदारांनीही आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी डिसेंबरमध्ये सुमारे साडेपाच लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या ट्रेंडिंग डिमॅट खात्यात जमा केले. त्याद्वारे तक्रारदारांना नफा होत असताना दिसत होता.

आणखी वाचा-अजित पवार यांच्याकडून आदित्यनाथ यांच्या मताचे खंडन; समर्थ रामदासांबाबत शरद पवार यांच्या विधानाशी सहमत

जानेवारी महिन्यापर्यंत हा नफा सुमारे ३५ लाख रुपये झाला होता. त्यानंतर तक्रारदारांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ती रक्कम त्यांना काढता आली नाही. अखेर तक्रारदारांनी याबाबत चौकशी केली असता त्यांना आणखी रक्कम खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यांनी काही रक्कम जमा केली. पण त्यानंतरही त्यांना नफा ट्रेडिंग खात्यातून काढता आला नाही. अखेर तक्रारदारांनी दूरध्वनी केला असता आरोपींनी मोबाइल बंद केल्याचे लक्षात आले. त्यामुळे संशय आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारदारांची साडेपाच लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. त्याबाबत बँक खात्याची पाहणी केली असता तक्रारदारांनी पाठवलेली रक्कम मध्य प्रदेशातील एका बँक खात्यात जमा झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी साहिल छाबडा (२१) याला मध्य प्रदेशातून अटक केली. याप्रकरणी इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man arrested from madhya pradesh in cyber fraud case of chief manager of private bank mumbai print news mrj