मुंबई: मोबाइलवर केवायसीसाठी आलेल्या बनावट संदेशामध्ये माहिती भरणे गोवंडीतील एका तरुणाला भलतेच महागात पडले. बँक खात्याची माहिती भरताच त्यामधून आठ लाख रुपये गायब झाले. याप्रकरणी तरुणाने देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओंकार पाठक (४५) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव असून तो गोवंडीच्या देवनार परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याला त्याच्या मोबाइलवर एक बनावट संदेश आला होता. बॅंकेच्या नावाने असलेल्या या संदेशात बँक खात्याची केवायसी भरण्यासबंधी मचकूर होता. तरुणाने तत्काळ हा संदेश उघडून त्यातील लिंकमध्ये त्याच्याबद्दलची आणि बँक खात्याची माहीत भरली. याच वेळी त्याला काही ओटीपी देखील आले होते. हे ओटीपी देखील त्याने या लिंकमध्ये टाकले. त्यानंतर काही वेळातच त्याच्या बँक खात्यामधून पैसे गायब झाले.

सुरुवातीला चार लाख, नंतर दोन, एक लाख आणि ८० हजार रुपये आशा प्रकारे भामट्याने त्याच्या बँक खात्यातून एकूण ७ लाख ८० हजार रुपये लंपास केले. ही बाब तरुणाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून त्यांना पैसे गायब झाल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने याबाबत देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.