लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : पूर्वीच्या वादातून २५ वर्षीय तरूणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली जुहू पोलिसांनी सहा जणांना अटक केली. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
मोहम्मद गौस इखलाक पटेल असे मृत तरूणाचे नाव आहे. विलेपार्ले येथील प्रेमनगर परिसरात ही घटना घडली. मृत तरूण व आरोपी एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मृत तरूण गौस ११ मार्च रोजी परिसरातून जात असताना तीन आरोपींसोबत त्याचा वाद झाला. तेव्हापासून उभयतांमध्ये वारंवार वाद होत होते. परिसरातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडविले होते. त्यांची समजूत काढली होती. पण आरोपींनी गौसला ठार मारण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर आरोपींनी गौसला लाथ्याबुक्यांनी, बांबूने मारहाण केली. तसेच तिक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. याप्रकरणी हत्या व दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी अमन उस्मान कुरेशी, सिराज हुसैन सय्यद, उस्मान इब्राहिम कुरेशी, इम्रान इमामसाहेब शेख, पीरमोहम्मद सय्यद हुसैन आणि ताबिश उस्मान कुरेशी यांना अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सहा आरोपी अटकेत
वादानंतर आरोपी गौसला मारण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती त्याच्या मित्रांना मिळाली होती. मित्रांनी आरोपीकडे जाऊन त्यांची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींनी गौसच्या मारण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्याच्या चार मित्रांनाही मारहाण केली. गौसवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात गौस गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गौसच्या कमरेवर आरोपींनी केलेल्या हल्लात गंभीर जखमा झाल्या होत्या. हल्ल्यााठी आरोपींनी सत्तूरचा (चाकू) वापर केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.
हत्येबाबतची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गौसचा भाऊ मुस्तफा पटेल याच्या तक्रारीवरून पोलिसांनी नऊ आरोपींविरोधात हत्या, गंभीर मारहाण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहा आरोपींनी आटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
तीन आरोपींची ओळख पटली
इतर तीन आरोपींचीही ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी दोन पथके तयार केली आहेत. तसेच आरोपींचा गुन्हेगारी, पूर्वइतिहास तपासण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.