लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारीने मुलुंड परिसरातील पदपथावरून चालणाऱ्या तरुणाला मंगळवारी पहाटे धडक दिली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून मुलुंड पोलिसांनी मोटारचालकाविरोधात कारवाई करून त्याची सुटका केली.
मुलुंडच्या पाच रस्ता परिसरात मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास हा अपघात झाला. मुलुंड परिसरात राहणारा पियुष रामचंदानी (२८) मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तेथे आला होता. वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर तो आणि अन्य दोघेजण पदपथावरून चालत त्यांच्या गाडीजवळ जात होते. याच वेळी भरधाव वेगात आलेल्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि पदपथावरून जात असलेल्या पियुषवर धडकली.
या अपघातात पियुष गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. पियुषवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलुंड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून आरोपी मोटारगाडी चालक दीप ठक्कर (२७) याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले.
© The Indian Express (P) Ltd