लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दोन अल्पवयीन मुलांनी एका २२ वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना सोमवारी मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी रस्त्यालगत एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. तरुणाच्या संपूर्ण शरीरावर मोठ्या प्रमाणात हत्याराने वार करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करून मानखुर्द परिसरातून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून किरकोळ वादातून हत्या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.