लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : होळीच्या पुजेसाठी दादर फुजबाजारात फुले आणण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. एल्फिन्स्टन उड्डाणपुलाजवळ झालेल्या अपघात दोन तरूणही जखमी झाले. पूल चढण्याआधी समोरून भरधाव वेगात आलेल्या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसने त्या तरुणांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात प्रणय बोडके याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे तरूण वास्तव्यास असलेल्या काळाचौकी परिसरात शोककळा पसरली आहे.

काळाचौकीच्या काळेवाडी येथे राहणारे जयेश मयेकर (२६) तसेच सोसायटीच्या मंडळातील अशोक रावनक (४४), सिद्धेश गोपाळ (३८), दुर्वेश गोरडे (२५), करण कुमार शिंदे (२९) आणि प्रणय बोडके (२९) हे सर्वजण बुधवारी रात्री २ च्या सुमारास दुचाकीवरून दादर (प.) येथूल फूल बाजारात फुले आणण्यासाठी निघाले होते. जयेश आणि सिद्धेश हे एका दुचाकीवर तर दुर्वेश, करण आणि प्रणय हे तिघे दुसऱ्या दुचाकीवरून जात होते. एल्फिन्स्टन पुलाजवळ ते आले असता समोरून वेगात आलेली एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस सिद्धेशच्या दुचाकीच्या जवळून गेली. त्यानंतर एसटी बसने तिघे बसलेल्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातामुळे तिघेही रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी लगेच घटनास्थळी जाऊन तिन्ही जखमी तरुणांना केईएम रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून प्रणय बोडके याला मृत घोषित केले. तर करण आणि दुर्वेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान, बेदकारपणे बस चालवून अपघाताला जबाबदार असलेला बसचालक मतिन शेख (२९) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मतिनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.