मुंबई : लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झालेल्या भामट्याने भांडुपमधील एका तरुणीला तब्बल साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तरुणीने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या भामट्याचा शोध घेत आहे.
तक्रारदार २९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणी असून ती भांडुप परिसरात भावासोबत राहते. अनेक वर्षांपासून विवाह होत नसल्याने या तरुणीने तिची माहिती लग्न जुळवणाऱ्या एका संकेतस्थळावर टाकली होती. काही दिवसांपूर्वी नबील खान (३१) याने तिला संदेश पाठवून लग्नाबाबत विचारणा केली. तरुणीने त्याला तात्काळ संदेश पाठवल्याने दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. भेटीदरम्यान दोघांनी कुटुंबियांशी चर्चा करून लग्न करण्याचे ठरवले. मात्र याच वेळी आरोपीने तरुणीला त्याचे पैसे परदेशात अडकल्याचे सांगितले आणि तिच्याकडून मोबाइल, दुचाकी घेण्यासाठी आणि इतर काही गोष्टी सांगून एकूण ४ लाख ६० हजार रुपये घेतले होते.
आरोपीने पुन्हा तरुणीला फोन करून पैशांची मागणी केली. मात्र वारंवार पैशांची मागणी होत असल्याने खानबद्दल तरुणीला संशय आला. तिने त्याच्याबद्दल काही ठिकाणी चौकशी केली. यावेळी खानने एका तरुणीला अशाच प्रकारे लग्नाचे अमिष दाखवून फसवल्याचे समजले. त्यामुळे तिने तत्काळ भांडुप पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.