मुंबई : मरीन ड्राईव्ह येथे सोमवारी एक तरूणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समुद्रातून तरूणीला बाहेर काढून जी.टी. रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
महिलेने समुद्रात उडी मारण्यापूर्वी चौपाटीवर तिची बॅग सोडली. त्यातील ओळख पत्रावरून महिलेचे नाव ममता प्रवीण कदम(२३) असल्याचे पोलिसांना समजले. तरूणी अंधेरी येथे राहण्यास असून एका प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत कामाला होता. सकाळी कामावर जात असल्याचे सांगून ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने थेट मरीन ड्राईव्ह स्थानक गाठले. तेथून इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल समोरील चौपाटीवरील समुद्रात ती उतरली.
हेही वाचा…कॅम्लिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन
सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान पोलिसांनी महिलेला बाहेर काढण्यासाठी शोध मोहिम राबवली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तेथे आली व तिने बॅग खाली ठेवली. त्यानंतर तिने समुद्रात स्वतःला झोकून दिले. तरूणीचा मोबाईल पोलिसांना सापडला असून त्यातील व्हॉट्सअॅप चॅटींगवरून वैयक्तीत कारणास्तव तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.