गेली अनेक वर्षे अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेयन्स) झगडून आणि उपनिबंधकांच्या कार्यालयात खेटे घालून थकलेल्या मुंबईतील ७० ते ८० टक्के इमारतींच्या नागरिकांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भावनिक पत्राने नवा जोम निर्माण केला आहे. ‘इमारत तुमचीच, भूखंडही तुमचाच.. मग नावावर का करून घेत नाही?’ अशी प्रेमळ विचारणा करणारे मुख्यमंत्र्यांच्या लेटरहेडचे पत्र सोसायटय़ांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्यान मुख्यमंत्र्याने थेट नागरिकांना साद घालणारे पत्र लिहिले आहे.
कन्व्हेयन्स नसल्यामुळे अनेक सोसायटय़ांना पुनर्विकासासाठी चटईक्षेत्रफळ मिळविताना खूपच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अशा सोसायटय़ांसाठी शासनाने ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ची पद्धत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू केली होती. परंतु प्रत्यक्षात काहीही होऊ शकले नव्हते. उपनिबंधक कार्यालयाकडून होत असलेल्या असहकार्यामुळे रहिवाशांनीही कागदपत्रे सादर करणे बंद केले. आता शासनाने ३० जूनपर्यंत ही योजना पुन्हा सुरू केली आहे.
मुंबईतील सोसायटय़ांना त्यांच्या विभागातील उपनिबंधकांकडून ‘डीम्ड कन्व्हेयन्स’साठी तूर्तास सोसायटीचे नाव व नोंदणी क्रमांक मागितला जात आहे. या पत्रासोबत मुख्यमंत्र्यांचे भावनिक आवाहनही जोडण्यात आले आहे. हे पत्र पाहून आता आपले काम नक्कीच होणार, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा