मुंबईः श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पवई पोलिसांनी २८ वर्षीय तरूणाला शनिवारी अखेर अटक केली. त्याच्याविरोधात अनैसर्गिक लैगिंक अत्याचार व प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>> पुणे: पोलीस भरतीची प्रतीक्षा कायम, उमेदवारांमध्ये निराशा

तक्रारदार महिला पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरात राहतात. त्या मुंबई अॅनिमल राईट्स या संस्थेसाठी काम करत असून ही संस्था प्राण्यांसाठी काम करते. परिसरातील प्राण्यांची काळजी घेणे, त्यांना खाणे देणे आदी कामे त्या करतात. एका सहकाऱ्याने त्यांना शनिवारी सायंकाळी एक चित्रफीत पाठवली. त्यात एका श्वानावर तरूण अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे चित्रफितीतील तरुण पोलीस ठाण्याच्या परिसरात दिसला. चित्रफीत पोलिसांना दाखवून महिलेने आरोपीविरोधात तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी २८ वर्षीय तरूणाविरोधात भादवि कलमासह प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदविला.

हेही वाचा >>> मुंबई पालिकेची ‘कॅग’कडून चौकशी ; १२ हजार कोटींच्या कामांत गैरव्यवहाराचा राज्य सरकारला संशय

आरोपी तरूण हा पवई येथे राहत असून त्याने या श्वानाला हिरा-पन्ना मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरील सज्जावर आणले होते. तेथे आरोपीने या श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार तेथील दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याच्या मोबाईलवर चित्रित केला. ती चित्रफीत सर्वदूर पसरली. ते चित्रीकरण तक्रारदार महिलेला मिळाल्यानंतर तिने पवई पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यावेळी परिसरात चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर स्थानिकांनी आरोपी तरूणाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून श्वानाला परळच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे श्वानाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तरूणासोबत या गुन्ह्यात आणखी काही तरूणांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस तपास करत आहेत. आरोपी व त्याच्या साथीदारांनी यापूर्वीही अशा प्रकारे इतर श्वानांवरही अत्याचार केल्याचा आरोप आहे.