मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर घडलेल्या घटनेबाबत वादग्रस्त पोस्ट इन्स्टाग्रामवर अपलोड करणाऱ्याला २५ वर्षीय तरूणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंधेरी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी कक्षामध्ये (एटीसी) कार्यरत असलेले पोलिस शिपाई देवीदास खेमनर यांना १६ जुलैला पोलिस ठाण्याच्या व्हॉट्सॲप गटात इंग्रजी भाषेतील मजकूर आणि चित्रफीत असलेले संकेतस्थळ दिसले.

हेही वाचा >>> सदनिकेच्या नावाखाली ७५ जणांची ६६ कोटींची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

त्यात मुंबई पोलिस दलाच्या दोन विभागांना टॅग करण्यात आले होते. खेमनर यांनी संकेतस्थळ उघडले असता त्यात ५५ सेकंद, १६ सेकंद आणि ३१ सेकंद एवढ्या कालावधीच्या चित्रफीत होत्या. त्या तिन्ही चित्रफीती कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील झालेल्या निष्कासन कारवाईच्या घटनेवरून दोन धार्मिक गटांत तेढ निर्माण करणाऱ्या होत्या. खेमनर यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर याप्रकरणी पोस्ट करणाऱ्या इन्स्टाग्राम आयडीधारकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर २५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली.