मुंबई: भांडुप परिसरात शनिवारी दुपारी एका तरुणाने तलवारीने बस, टेम्पोसह अनेक वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच भांडूप पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाठलाग करून आरोपीला अटक केली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भांडूपमधील टँकरोड परिसरात शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. याच परिसरात राहणारा १७ वर्षीय मुलगा तलवार घेऊन मुख्य रस्त्यावर आला. समोरून येणाऱ्या एका बेस्टवर त्याने तलवारीने हल्ला केला आणि बसची समोरील काच फोडली. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची एकच धावपळ उडाली. बसमधून उतरून प्रवाशांनी पळ काढला. त्यानंतर आरोपीने रस्त्यावरील एक टेम्पो, दोन रिक्षा आणि एका मोटारगाडीची काच फोडली.

अनेकांनी ही घटना मोबाइलच्या कॅमेऱ्याने टिपली. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ भांडूप पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर भांडूप परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.