मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरच बुधवारी साताऱ्यातील व्यक्तीने हातावर कटरने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला नोटीस देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. मूळचे सातारा येथील फलटणचे रहिवासी असलेले सुरेश पांडुरंग जगताप (४६) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. त्यांनी प्रवेशिका(पास) घेऊन बुधवारी मंत्रालयात प्रवेश केला.
हेही वाचा >>> मुंबई: बनावट चावीद्वारे बँकेच्या दोन लॉकरमधून ४७ लाखांची चोरी; बँक कर्मचाऱ्याला अटक
फडणवीस यांच्या दालनासमोर येताच त्यांनी हातावर कटरने वार करण्यास सुरूवात केली. तेथील पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यांना जी. टी. हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पुढे, मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. त्यांना फौजदारी दंड प्र.सं. कलम ४१ (अ) (१) अन्वये नोटीस देत सोडण्यात आले आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने डाव्या हाताला कटरने जखम केली आहे. जीटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले असून आत्महत्येत वापरण्यात आलेले कटर पोलिसांनी जप्त केले आहे.