मुंबईत कामावरुन घरी जाणाऱ्या मराठी तरुणाला परप्रांतीयांनी चोप दिला. हा मुलगा घरी जात असताना त्याला मारहाण करण्यात आली आहे. तसंच त्याला जय श्रीरामचे नारे देण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने या संदर्भातलं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे मुंबईत चाललं आहे? हाच प्रश्न पडतो आहे. कारण मुंबईत एका महिलेला घर नाकारण्यात आलं. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला. घर नाकारत असताना तिला मराठी म्हणून हिणवलं गेलं. तसंच तिच्याबरोबर अरेरावीही करण्यात आली. हे प्रकरण ताजं असतानाच आता ही नवी घटना समोर आली आहे.
वंचित बहुजन आघाडीने काय म्हटलं आहे?
गोकुळ नगर, कांदिवली पूर्व, मुंबई येथे कामावरून घरी जाणाऱ्या सिद्धार्थ अंगुरे या मराठी तरुणाला रस्त्यात अडवून परप्रांतीय लोकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करण्यात आली. तसेच तरुणाला शिवीगाळ करत अमानुष मारहाण करण्यात आली. यात तो तरुण जखमी झाला.
याप्रकरणी पीडिताने वंचित बहुजन आघाडीकडे धाव घेतली. ‘वंचित’च्यावतीने पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी सुरज तिवारी, अरुण पांडे, पंडित, राजेश रिक्षावाला यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ३४१, ५०४, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडित सिद्धार्थ अंगुरे यांच्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथे उपचार सुरू आहेत.
मुंबईत मराठी तरुणाला परप्रांतीयांनी मारहाण केल्याच्या या घटनेनंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसंच या हल्ल्यात हा तरुण जखमी झाल्याने त्याच्यावर कांदिवलीत उपचार सुरु करण्यात आले आहेत. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.