मुंबई : परळ येथील ३१ वर्षीय तरूणाची तोतया सायबर अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सक्त वसुली संचलनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) व रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) या यंत्रणा तपास करीत असल्याची भीती दाखवून आरोपींनी तक्रारदार तरूणाला ८ तासांहून अधिक काळ डिजिटल अटक केली होती. याप्रकरणी तरूणाच्या तक्रारीवरून रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
परळ येथे वास्तव्यास असलेल्या ३१ वर्षीय तरूणाला २ मार्च रोजी सकाळी ९ वाजता अनोळखी क्रमांकावरू दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियामधून (ट्राय) बोलत असल्याचे सांगितले. तुमचा मोबाइल क्रमांक बंद करण्यात येणार असून तुमच्या मोबाइलवरून सायबर फसवणूक झाली आहे, असे त्या व्यक्तीने तक्रारदाराला सांगितले. त्यामुळे तक्रारदार तरूण घाबरला व आपला याप्रकणात कोणताही सहभाग नसल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी त्या व्यक्तीने त्याला याबाबत सायबर पोलिसांशी बोलण्यास सांगितले. त्यानंतर तोतया सायबर अधिकाऱ्याने त्यांना व्हीडीओ कॉल केला. समोर पोलिसांचा गणवेश घालून असलेल्या व्यक्तीने तक्रारदारकडे आधारकार्ड मागितले. त्या व्यक्तीने सायबर फसवणुकीसह ईडीमध्येही आर्थिक गैरव्यवहारात तुमचा सहभाग असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार तरूण घाबरला. तोतया सायबर अधिकाऱ्याने त्याला सीबीआय व आरबीआयही याप्रकरणी तपास करीत असल्याचे सांगितले.
त्यानंतर तक्रारदाराला केंद्रीय यंत्रणेतील अधिकारी असल्याचे भासवूनही संपर्क साधण्यात आला. यावेळी त्यांना सीबीआय व रिझर्व बँकेच्या नावाने विविध कागदपत्रे पाठवण्यात आली. त्यात तुमच्याविरोधात दाखल गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात येत आहे. अटक टाळायची असेल, तर तुम्हाला गैरव्यवहाराच्या काही टक्के रक्कम खात्यात जमा करावी लागले. असे धमकावून तक्रारादाराला दोन लाख ५१ हजार ९३४ रुपये भरण्यास सांगितले. तक्रारदाराने घाबरून आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले. सायंकाळी ७ पर्यंत त्यांना डिजिटल अटकेत ठेवण्यात आले. तसेच हा प्रकार कोणालाही न सांगू नये असे सांगण्यात आले होते. पण तक्रारदाराने याबाबत एका परिचित व्यक्तीला विचारले असता त्याने हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला त्याने दिला. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदाराकडून रक्कम जमा करण्यात आलेल्या बँक खात्याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.