मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या पोलीस भरतीप्रक्रियेमध्ये २६ वर्षीय उमेदवाराचा शुक्रवारी मृत्यू झाला. गणेश उगले असे मृत उमेदवाराचे नाव असून १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर तो खाली कोसळला. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्युचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला उगले अन्य तरुणांसोबत मुंबई पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी तो कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी दाखल झाला. त्याने १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेचच तो जमिनीवर कोसळला. भरती प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तात्काळ त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उगले आणि त्याच्या चुलत भावाने मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज केला होता. गुरुवारी हे दोघेही मुंबईत आले होते. रात्री तंबुत राहिल्यानंतर शुक्रवारी सकाळी उठून ते भरती प्रक्रियेत सहभागी झाले. सकाळी पावणेअकराच्या सुमारास उगले १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत सहभागी झाला होता. त्याने ही चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडताच तो कोसळला. वैद्यकीय पथकाने उगले याची तपासणी केली आणि तात्काळ त्याला उपचारांसाठी सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेने सर्वानाच धक्का बसला. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली.
पोलीस दलात दाखल होण्याचे स्वप्न उराशी बांधून दोघेही भरतीत सहभागी झाले होते. मात्र, गुरुवारी रात्री एकत्र राहिल्यानंतर सकाळी उगलेच्या मृत्युने चुलत भावासह कुटुंबीयांना धक्का बसला आहे. पोलिसांनी उगले याच्या चुलत भावाकडे चाैकशी केली असता, त्याने कोणत्याही अस्वस्थतेची तक्रार केली नव्हती. पोलिसांनी मृत उमेदवार उगले याच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली असून पुढील तपास करण्यात येत आहे.