मुंबई : वरळीमध्ये एका व्यावसायिकाच्या आलिशान मोटरगाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड (२८) असे या तरुणाचे नाव आहे. आलिशान मोटारगाडीने फरफटत नेल्यामुळे कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तिथून अवघ्या १०० मीटर अंतरावर तशाच प्रकारची घटना घडली आहे.
वरळी सीफेसजवळ ए.जी. खान अब्दुल गफारखान मार्गावर २० जुलै रौजी कामावरून घरी परतत असताना विनोदच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू मोटारगाडीने मागून जोरदार धडक दिली. तो खाली पडून डोक्याला दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाला होता. पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या मोटारगाडीच्या चालकाने त्याला नायर रुग्णालयात नेले. तेथे विनोदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा >>> शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून बंद; मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता
अपघातग्रस्त मोटरगाडी ठाण्यातील एका अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी हा व्यावसायिक वरळीमध्ये आला होता. अपघात झाला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर गाडी चालवत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विवाहसोहळ्याच्या उत्साहावर विरजण
मूळचा मालवणचा रहिवासी असलेल्या विनोद ठाण्यामध्ये एका खासगी वाहतूक कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करत होता. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या हिमतीवर ही नोकरी मिळविली होती. विनोद हिल रोड येथे आपल्या चुलत बहिणीकडे राहात होता. डिसेंबरमध्ये विनोदचा विवाह होणार होता. त्यासाठी त्याने अलीकडेच मंगळसूत्र व अंगठीही खरेदी केली होती, अशी माहिती त्याचे मेहुणे सूर्यकांत जाधव यांनी दिली.