मुंबई : हिंदूजा रुग्णालयासमोरील चौपाटीवर सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाच जण बुडाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत हर्ष किंजले (१९) या तरुणाचा मृत्यू झाला. यश अशोक कांगडा (१८) हा तरुण अद्याप बेपत्ता असून जीवरक्षकांनी सोमवारी रात्री काळोख आणि प्रतिकूल वातावरणीय परिस्थितीमुळे शोधमोहीम थांबवली.
हिंदूजा रुग्णालयासमोरील चौपाटीवर सोमवारी पाच तरुण फिरायला गेले असताना ही दुर्घटना घडली. स्थानिक पोलिसांकडून संबंधित दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत पाच जणांपैकी दोघांना वाचविण्यात पालिकेच्या जीवरक्षकांना यश आले. जखमी असलेल्या इतर दोघांना पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी तात्काळ नजीकच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हर्ष किंजले या तरुणाची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ओम लोध (१७) या तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महानगरपालिकेच्या जीवरक्षकांकडून बेपत्ता यश अशोक कांगडा या तरुणाचा सोमवारी रात्रीपर्यंत शोध घेणे सुरू होते. अनेक प्रयत्न करूनही त्याचा शोध लागला नाही. अखेर रात्री आठच्या सुमारास जीवरक्षकांनी शोधमोहीम थांबवली.
हेही वाचा >>> मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या २५७ पैकी केवळ ११९ झाडांचेच पुनर्रोपण, एमएमआरसीएलचा उच्च न्यायालयातील समितीसमोर प्रस्ताव
धुळवड साजरी करताना विविध ठिकाणी ९३ जखमी
* मुंबईत उत्साहाने साजऱ्या झालेल्या धुळवडीत विविध घटनांमध्ये ९३ जण जखमी झाले. जखमींमध्ये बहुतेकजण हे धुळवड साजरा करताना झालेल्या मारामारीत जखमी झाले आहेत, तर काहीजण हे धुळवड खेळताना पडल्याने जखमी झाले आहेत.
* ९३ जखमींपैकी ३२ रुग्ण शीव रुग्णालयातील अपघात विभागामध्ये दाखल झाले होते. ३१ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. त्यातील बहुतांश रुग्ण आपापसांत झालेल्या भांडणामध्ये किंवा धुळवड खेळताना पडून जखमी झालेले होते.
* नायर रुग्णालयात दिवसभरात १४ जखमींची नोंद झाली. त्यातील तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर बाकींना बाह्यरुग्ण विभागात उपचार करून घरी पाठविण्यात आले. रासायनिक रंगाच्या वापरामुळे इजा झालेले दोन रुग्ण होते तर आठजण हे आपापसांत भांडण झाल्याने जखमी झाले होते, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.
* केईएम रुग्णालयात १९ जण दाखल झाले. त्यातील चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिली. * जे. जे. रुग्णालयात १८ जण उपचारासाठी दाखल झाले होते. त्या सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.