दैनंदिन धकाधकीचे जीवन, अपुरी झोप, कामाचा तणाव, नैराश्य, अपयश यामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. मानसिक आरोग्य बिघडणाऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या टेली मानस हेल्पलाईनवर मोठ्या संख्येने नागरिक संपर्क साधत आहेत. मात्र या हेल्पलाईनवर संपर्क साधणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. यावरून तरुणांमध्ये मानसिक आजार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा >>> ‘पीएमएलए’ कायद्यातील आजारी व्यक्तीच्या व्याख्येत मलिक येतात का? उच्च न्यायालयाची विचारणा
बदलती जीवनशैली व कामाच्या स्वरुपामुळे नागरिकांमध्ये नैराश्य, स्क्रिझोफेनिया, एन्झायटी असे आजारा वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना योग्य वेळी उपचार मिळावेत, त्यांना आपले मन मोकळे करता यावे आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्य सरकारने टेली मानस ही हेल्पलाईन (हेल्पलाईन क्रमांक १४४१६) सुरू केली आहे. यावर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकूण त्याचे समुपदेशन करण्यात येते. तसेच गरज भासल्यास नागरिकांचा दूरध्वनी डॉक्टरांशी जोडून देण्यात येतो. ही हेल्पलाईन २४ तास सुरू असून तीन पाळ्यांमध्ये समुपदेशक नागरिकांचे समुपदेशन करतात. या हेल्पलाईनवर दिवसाला सुमारे १०० दूरध्वनी येतात. मात्र यामध्ये २० ते ४० वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. दूरध्वनी करणाऱ्या तरुणांना झोप न येणे, कामाचा तणाव, कौटुंबिक कलह, मनात अनामिक भीती निर्माण होणे, वरिष्ठांकडून येणाऱ्या कामाचा तणाव, वरिष्ठांकडून होणारा छळ या समस्या अधिक असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी दिली.
हेही वाचा >>> मुंबई : अभिनेता सुबोध भावे दिसणार बिरबलाच्या भूमिकेत
राज्यात प्रथम ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये टेली मानस हेल्पलाईन सुरू करण्यात आली. त्यानंतर राज्यातील अन्य दोन ठिकाणी टेली मानस हेल्पलाईन केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे सुरुवातीला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील हेल्पलाईनवर दिवसाला १५० ते २०० दूरध्वनी येत होते. मात्र आता ते दूरध्वनी अन्य केंद्रांकडे जात आहेत. परिणामी, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दिवसाला ७५ दूरध्वनी येत असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी दिली.
ही काळजी घ्या मानसिक रुग्णांनी बरे होण्यासाठी नियमित औषधे घेण्याबरोबरच आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल करणे आवश्यक आहे. योगासने, ध्यानधारणा, व्यायाम, पोहणे, मैदानी खेळ खेळणे, बाहेर फिरायला जाणे, मित्र परिवारासोबत मनसोक्त गप्पा मारणे यावर भर द्यायला हवा. त्याचबरोबर भविष्याचा विचार करण्यापेक्षा सध्याचा क्षण जगण्याचा प्रयत्न करावा, काल्पनिक भीती बाळगू नये, असे आवाहन राज्य आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी केले.