लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: चेंबूर परिसरात सोमवारी मध्यरात्री किरकोळ कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर २१ वर्षीय आरोपीने चाकूने वार करून मित्राची हत्या केली. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास असलेला फरीद शेख (२०) सोमवारी रात्री चेंबूर कॉलनी येथील लालमिठी मैदान परिसरात मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. यावेळी याच परिसरात राहणाऱ्या वैभव भिंगारदिवे (२१) बरोबर त्याची बाचाबाची झाली. संतप्त झालेल्या फरीदने रागाच्या भरात वैभवच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. त्यानंतर संतापलेल्या वैभवने चाकूने फरीदवर अनेक वार केले. त्यात फरीद गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.