कल्याणमध्येही एक इसमाचा खून

कल्याण डोंबिवलीत दोन वेगळ्या घटनांमध्ये दोघांचे खून करण्यात आले आहेत. तरुणींची छेड काढणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या तरुणाला एका टोळक्याकडून बेदम मारहाण झाल्याने तसेच त्याच्यावर शस्त्रांचे वार झाल्याने तो जागीच मरण पावला. तर, कल्याण येथे रेल्वेत खलाशी असणाऱ्या कर्मचाऱ्याची बंद घरात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
मानपाडा पोलिसांनी सांगितले, डोंबिवली पूर्व येथील नवनीत नगर येथे राहणारा संतोष विच्छीवोरा (वय १९) हा तरुण घरी जात होता. त्या वेळी पाच ते सहा तरुण ये-जा करणाऱ्या तरुणींची छेड काढीत होते. संतोषने त्यांना जाब विचारताच या टोळक्याने संतोषला बेदम मारहाण करून त्याच्यावर शस्त्राने वार केले. त्यात तो जागीच मरण पावला. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
दुसऱ्या घटनेत, कल्याण पूर्व येथे विनायक चौकातील नवपंचक सोसायटीत दत्तात्रय मनवे (वय ४०) याची बंद घरात गळा चिरून हत्या करण्यात आली.
गोपाळा फर्नाडिस या महिलेच्या मालकीचे सदर घर असून ती घरात नसताना हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गोपाळा हिची कोळसेवाडी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Story img Loader