लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून २०४७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होतील. येत्या २५ वर्षांमध्ये भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले असून त्यासाठी त्यांनी स्टॅण्डअप, स्टार्टअपसारखे उपक्रम सुरू करून उद्योजकांना प्रोत्साहन दिले आहे. त्यातून रोजगार निर्मितीबरोबरच भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. विकसित राष्ट्रांनी संशोधन, पेटंट आणि स्वामित्व धनावर (रॉयल्टी) भर दिला आहे. त्यामुळे तरुणांनीही संशोधन कार्यावर भर दिला पाहिजे. तर विकसित राष्ट्रांच्या जी- २० या संघटनेचे अध्यक्षपदही भारताकडे आले आहे’, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मुंबईतील एचएसएनसी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘जी २० युवा संवाद – भारत @२०४७’ या कार्यक्रमाचे शनिवारी के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एचएसएनसी विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. निरंजन हिरानंदानी आणि स्वागताध्यक्षा कुलगुरू डॉ. हेमलता बागला होत्या. तर राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य समन्वयक डॉ. रामेश्वर कोठावळे, एचएसएनसी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान बलानी, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सतीश कोलते, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.

आणखी वाचा-मुंबई: नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला उत्तराखंडमधून अटक

डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले की, ‘राष्ट्रीय सेवा योजना हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे स्वयंसेवकांचे संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून ग्रामविकासाची कामे केली जातात. अशाच लहान कार्यक्रमांमधून परिवर्तन घडून येते. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रोजगारक्षम मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी पूरक असल्यामुळे आगामी काळात देशात बदल घडून येईल’. तर डॉ. हेमलता बागला यांनी विद्यापीठ आणि जी २० परिषदेच्या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. पुण्यातील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी बीजभाषण दिले. तर युवा विचार मंच या सत्रामध्ये ‘अमृत काळातील पंचप्रण’ या मुख्य विषयाअंतर्गत विकसित भारत, गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तीचा संकल्प, भारतीय वारशाचा अभिमान, एकात्मतेचे सामर्थ्य, नागरिकांची कर्तव्ये या उपविषयांवर विद्यार्थ्यांनी विचार मांडले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth should focus on research says chandrakant patil mumbai print news mrj
Show comments