प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडी यांच्यातील जीवघेण्या पोकळीत अनेक प्रवासी पडून जखमी होत असताना मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकावर मात्र एक अजब प्रकार घडला. चर्चगेटकडे जाणारी गाडी पकडण्याच्या प्रयत्नात एक तरुण प्लॅटफॉर्म व गाडी यांच्या पोकळीत पडला. प्रवाशांच्या आरडाओरडय़ानंतर गाडी थांबली. प्रवाशांना धाव घेत गाडीखाली पाहिले असता तो तरुण सुखरुप असल्याचे आढळून आल्यानंतर सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला.
चर्चगेटच्या दिशेने बोरिवलीहून निघालेली गाडी दुपारी १.०८ वाजता मालाड स्थानकात शिरली. या स्थानकात उभा असलेला एक २२ वर्षीय तरुण गाडी स्थानकात शिरताच ती पकडण्यासाठी पुढे सरसावला आणि कोणाला काही कळायच्या आतच तो प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील पोकळीत पडला. यावेळी जीवघेण्या पोकळीत पडलेल्या या तरुणाने थोडेसे प्रसंगावधान दाखवले. प्लॅटफॉर्मचा पृष्ठभाग थोडासा पुढे आलेला असतो. मात्र प्लॅटफॉर्मची खरी सुरुवात रुळांपासून दीड-दोन फुट आतमध्येच होते. नेमक्या या पोकळीत हा तरुण सुखरूप राहिला. इतर प्रवाशांनी त्याला वर खेचले आणि उपदेशपर डोस पाजले. काही वेळाने हा तरुण आणि ती गाडीही आपापल्या मार्गानी पुढे निघाले. पण त्या वेळी त्या तरुणासह प्रत्येक प्रवाशाच्या मनात एकच भावना होती, ‘काळ आला होता, पण वेळी आली नव्हती..’

Story img Loader