मुंबईः लहान मुलाला खाऊ व पैशांचे आमिष दाखवून अपहरण केल्यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याचा गंभीर प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला असून चुनाभट्टी पोलिसांनी १९ वर्षीय तरूणाला अटक केली. आरोपी मूळचा बिहारमधील चंपारण्य येथील रहिवासी आहे. आरोपीने मुलाचा गळा दाबून ठार मारले. मुलाच्या संपूर्ण अंगावर जखमा असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मृत मुलगा ९ वर्षांचा असून तो मध्य मुंबईत कुटुंंबियांसोबत राहत होता. या मुलाला १९ वर्षीय आरोपी मंगळवारी भेटला. आरोपीने खाऊ व पैसे देण्याचे आमिष दाखवून मुलाला आपल्यासोबत आणले. आरोपी मुलाला बुधवारी पहाटे चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कुर्ला पूर्व येथील कब्रिस्तान मशिदीशेजारील नागोबा चौक परिसरातील रेल्वे गेटजवळ घेऊन गेला. आरोपी तेथे मुलावर जबरदस्ती करू लागला. आरोपीने अत्याचार करण्यास सुरूवात करताच मुलाने त्याला प्रतिकार केला. त्यावेळी आरोपीने त्याचा गळा दाबला आणि त्याला ठार मारले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकांनी स्वतः तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १०४, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम ४, ६, १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला बुधवारी रात्री अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुलाच्या अंगावर जखमा
या मुलाला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. मुलाच्या संपूर्ण अंगावर जखमा आहे. आरोपीने हत्या करण्यापूर्वी त्याला मारहाण केल्याचा संशय आहे. मुलाच्या मृतदेहाचे लोकमान्य टिळक रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याशिवाय न्यायवैद्यक तज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. याशिवाय श्वानपथकही घटनास्थळी दाखल झाले होते.
अत्याचार करणाऱ्या तरूणाला अटक
अल्पवयीन मुलाची निर्घुण हत्या केल्याप्रकरणी १९ वर्षीय तरूणाला बुधवारी रात्री चुनाभट्टी पोलिसांनी अटक केली. आरोपी मूळचा बिहारमधील मोधापूर येथील रहिवासी आहे. सध्या आरोपी ठाण्यातील भिवंडी परिसरात राहत होता. आरोपींचा गुन्हेगारी पूर्व इतिहास तपासण्यात आला असून यापूर्वी त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे गुन्हे केले आहेत का, याबाबतही चौकशी सुरू आहे.