मुंबई : घरोघरी अन्नपदार्थ पोहोचविण्याचे काम करणाऱ्या तरुणाने शहरातील विविध भागांतून तब्बल १२ दुचाकी चोरल्या. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी कसून शोध घेऊन आरोपीला ठाणे परिसरातून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून १२ दुचाकी हस्तगत केल्या.
घाटकोपरमधील पंतनगर परिसरातील बँकेबाहेर उभी असलेली एक दुचाकी २ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने चोरली. दुचाकीचालकाने याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. दुचाकी चोरणारा आरोपी ठाणे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल १२ दुचाकी चोरल्याची कबुली त्याने चौकशीत दिली.
हेही वाचा – नवीन करोना उपप्रकाराचे डॉक्टरांपुढे आव्हान!
मंगेश गुप्ता (३०) असे आरोपीचे नाव असून तो अन्नपदार्थ घरपोच करणाऱ्या एक ऑनलाइन कंपनीत काम करतो. ग्राहकाच्या घरी अन्नपदार्थ पोहोचविण्यासाठी जाताना रस्त्यावर चावी लागलेली एखादी दुचाकी दिसताच मंगेश ती घेऊन पळ काढायचा. काही दिवसांत तो चोरलेल्या दुचाकी विकणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली.